कांदा पिकात योग्य वेळी खते देणे आवश्यक आहे. खते देण्यापूर्वी माती परीक्षण करावे. नत्र विभागून दोन ते तीन हप्त्यांत दिले असता त्याचा चांगला फायदा होतो. कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मँगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. त्यानुसार खत व्यवस्थापन करावे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कांदा पिकाचे खरीप, रांगडा तसेच रब्बी (उन्हाळी) असे प्रकार आहेत. रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केली जाते. एक हेक्टर लागवडीसाठी साधारणतः ८-१० किलो बियांची रोपवाटिका पुरेशी होते. रोपे ८-९ आठवड्यांची झाल्यानंतर त्यांची १५x१० सेंमी अंतरावर पुनर्लागवड करतात.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात योग्य वेळी खते देणे आवश्यक आहे. पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. सेंद्रिय खतामुळे कांद्याची साठवण क्षमता वाढते.
रब्बी कांद्यासाठी नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५० किलो (सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो) आणि पालाश ५० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो) प्रतिहेक्टर द्यावे. अर्धे नत्र (५० किलो - युरिया १०९ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावा. उर्वरित (नत्र ५० किलो - युरिया १०९ किलो) पुनर्लागवडीनंतर १ आणि दीड महिन्याने समान हप्त्याने द्यावा.
नत्र विभागून दोन ते तीन हप्त्यांत दिले असता त्याचा चांगला फायदा होतो. कांदा पूर्ण पोसल्यानंतर मात्र नत्राची आवश्यकता नसते. अशा वेळी नत्र दिल्यास डेंगळे येणे, जोड कांदे येणे, कांदा साठवणुकीत सडणे हे प्रकार होतात.
पिकांच्या मुळांच्या वाढीकरिता स्फुरदाची आवश्यकता असते.
जमिनीत पालाशचे प्रमाण भरपूर असले, तरी पिकांना उपलब्ध होणाऱ्या पालाशची मात्रा कमी आहे. पालाश कांद्याचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी, कांद्याला आकर्षक रंग येण्यासाठी आवश्यक असतो.
याव्यतिरिक्त रब्बी हंगाम कांदा पुनर्लागवडीपूर्वी १५ दिवस आधी गंधक हेक्टरी ४५ किलो या प्रमाणात द्यावे.
खते देण्यापूर्वी माती परीक्षण करून, त्याप्रमाणे तज्ज्ञांच्या साह्याने खताची मात्रा ठरवावी. कांदा पिकास शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त व लागवडीच्या ६० दिवसांनंतर नत्र दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते, मान जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण जास्त निघते. साठवणक्षमता कमी होते.
सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज
कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मँगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे रोपांची वाढ खुंटते. पातीचा रंग करडा, निळसर पडतो.
जस्ताची उणीव भासल्यास पाने जाड
होऊन खालच्या अंगाने वाकतात. अशी लक्षणे दिसताच शिफारशीत खताच्या मात्रेबरोबर झिंक सल्फेट १ ग्रॅम, मॅंगनीज सल्फेट १ ग्रॅम, फेरस सल्फेट २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
कांदा पुनर्लागवडीपासून १५, ३० आणि
४५ दिवसांनी १९:१९:१९ या विद्राव्य मिश्रखताची ५ ते १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पुनर्लागवडीपासून ६०, ७५ आणि ९० दिवसांनी १३:००:४५ (पोटॅशिअम नायट्रेट) ५ ते १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास कांद्याची फुगवण होते व जादा उत्पादन मिळते.
तण व्यवस्थापन
कांदा पिकाची घनता तीव्र असते. तसेच, पिकाची मूळ उथळ असतात. त्यामुळे पीक-तण स्पर्धा कालावधी लागवडीपासून ४५ दिवसांपर्यंत अधिक असतो. या कालावधीमध्ये तणांचे नियंत्रण काळजीपूर्वक करावे. खुरपणीसाठी मजुराची उपलब्ध नसल्यास कांद्यामध्ये ४५-६० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटू शकते. या काळामध्ये एकात्मिक तण व्यवस्थापन करावे.
- डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२ (उद्यानविद्या विभाग, के. व्ही. के., सरदारकृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, खेडब्राह्मा, गुजरात.)
No comments:
Post a Comment