कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान येत्या काळात जमीन, माती, पीक व्यवस्थापन आणि वेळ वाचविण्यास उपयुक्त ठरणारे आहे. यामुळे जमिनीचा कार्यक्षम वापर करता येणे शक्य आहे. पीक परिस्थितीनुसार सल्ला व शिफारसी देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान वापराची मोठी संधी आहे.
आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सध्याच्या काळात विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर आता कृषी क्षेत्रातही होऊ लागला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने आपण पीक नुकसान कमी करू शकतो. येत्या काळात स्मार्ट शेतीपद्धती फायदेशीर ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात शेतीसंबंधी माहिती गोळा करणे शक्य आहे. आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) तंत्रज्ञानाचा वापर करून विविध माहितीचे योग्य विश्लेषण शक्य आहे. त्यामुळे शेती व्यवस्थापनातील ताण कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर महत्त्वाचा ठरेल. यासाठी शेतकऱ्यांचा कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान या महत्त्वाच्या बाबी आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान येत्या काळात जमीन, माती, पीक व्यवस्थापन आणि वेळ वाचविण्यास उपयुक्त ठरणारे आहे. जमिनीचा कार्यक्षम वापर यामुळे करता येणे शक्य आहे. या तंत्रज्ञानामुळे पीक हंगाम, हवामान, पर्जन्यमानाच्या पूर्वानुमानानुसार नियोजन करणे शक्य होणार आहे. पीक परिस्थितीनुसार सल्ला व शिफारसी देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान वापरासाठी मोठी संधी आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेती व्यवस्थापनात वापर केल्यामुळे पीक नियोजन, व्यवस्थापनात तातडीने बदल करणे शक्य होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा, आयओटीमधील तंत्रज्ञानाची प्रगती शेती विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे.
आयओटीद्वारे (इंटरनेट ऑफ थिंग्ज) चालना
माहिती तंत्रज्ञानाचा वापर शेती प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. या माध्यमातून हवामान, माती तपासणी अहवाल, नवीन संशोधन, पाऊस, कीड-रोगांचा प्रादुर्भाव यांची एकत्रित माहिती संकलित होणार आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी ड्रोन आणि सेंन्सरचा वापर वाढतो आहे. प्रॉक्सिमिटी सेन्सिंग आणि रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान येत्या काळात महत्त्वाचे असणार आहेत. सेन्सरच्या माध्यमातून मातीमधील अन्नद्रव्ये तपासून संबंधित पिकाला कशाची गरज आहे ही माहिती संबंधित प्रणाली सांगू शकते.
शेतामध्ये एका विशिष्ट ठिकाणी आयओटी सक्षम सेन्सर लावले जातात. हे सेन्सर हवामान स्थिती, मातीचा ओलावा, सुपीकता, मुळे आणि पिकाची वाढ याची माहिती संगणक प्रणालीला देतात. याचबरोबरीने पानांची वाढ, प्रकाश संश्लेषण, फुले, बियांची वाढ, कीड- रोगाचा प्रादुर्भाव याचीदेखील माहिती संगणक प्रणालीमध्ये जमा होते.
आयओटी प्रणालीमध्ये वायफाय तंत्र, मायक्रो कंट्रोलर, व्हीजीए इमेज सेन्सर, मायक्रो सोलर पॅनेलसह मिनी बॅटरी बसविलेली असते. संपूर्ण क्षेत्राचा विचार करून शेतामध्ये वायफाय हॉट स्पॉट टॉवर्स बसवून विविध विषयांसंबंधी माहिती गोळा केली जाते.
माहितीचा योग्य वापर
हवामान, बियाणे प्रकार, मातीची गुणवत्ता आणि रोगांची संभाव्यता, मागील काही वर्षांची संकलित माहिती, बाजारपेठेचा ट्रेंड आणि किमती याविषयी माहितीचे विश्लेषण करणारी प्रणाली विकसित होत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी होत आहे.
ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर
काटेकोर शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची प्रतिमा घेतली जाते. या छायाचित्राच्या विश्लेषणातून योग्य नियोजन करता येते. कॉम्प्युटर व्हिजन तंत्रज्ञान, आयओटी आणि ड्रोनच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा अभ्यास करून पीक व्यवस्थापनाचा निर्णय घेता येतो.
कीड-रोग प्रादुर्भावाची ओळख
यामध्ये पानांचे छायाचित्र, प्रादुर्भाव झालेला आणि न झालेला भाग, कीड- रोगाची पूर्वसूचना याची माहिती संकलित केली जाते. त्याचे प्रयोगशाळेत योग्य विश्लेषण करून पीक व्यवस्थापन केले जाते.
पीक उत्पादन अंदाज
सध्याची हिरवी फळे पूर्णपणे काढणीस कधी तयार होतील हे निश्चित करण्यासाठी पांढऱ्या आणि अतिनील प्रकाशाच्या खाली पिकांच्या प्रतिमांचा अभ्यास केला जातो. त्यानुसार काढणीचे वेळापत्रक ठरवणे शक्य होते.
- डॉ. महेश खामकर, ७५८८१६३१४७ (कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)
0 comments:
Post a Comment