Pages - Menu

Friday, May 1, 2020

'या' महिलांना मानलेच पाहिजे राव, लॉकडाऊनमध्येही...

कोरोना संकटाच्या काळात अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यातही काही व्यावसायिक संकटात संधी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. उमेद अभियानांतर्गत स्थापन केलेल्या संगमेश्वर तालुक्यातील (जि. रत्नागिरी) ५४९ बचत गटांतील २६०० महिलांनी लॉकडाऊनच्या काळात कोंबड्यांच्या विक्रीतून  एकूण सुमारे २० ते २५ लाख रूपयांचा नफा मिळवला आहे. या काळात चिकन व्यवसाय अडचणीत आला असताना या बचत गटांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद व दिशादर्शक ठरणारी आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद या व्यासपीठाची सुरूवात संगमेश्वर तालुक्यात २०१२- १३ च्या दरम्यान झाली. दुर्गम व डोंगराळ भागातील महिला त्या निमित्ताने एकत्र आल्या. शाश्वत उपजीविकेसाठी भात लागवड करणे, पारंपरिक व्यवसायांना चालना देणे, झेंडूसारख्या पिकातून फूलशेती आदी उपक्रमांना चालना मिळाली. मात्र अजूनही सक्षम अर्थकारण तयार होण्याची गरज होती. त्यातूनच मागील वर्षी पोल्ट्री व्यवसायावर भर देण्यात आला. गटातील काही महिलांना तज्ज्ञांमार्फत आवश्‍यक प्रशिक्षण देण्यात आले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लॉकडाऊनमध्ये मिळाली संधी  
यंदा मार्च- एप्रिलमध्ये कोरोनाचे संकट सुरू झाले. ब्रॉयलर कोंबड्यांचे अर्थात चिकनचे दर पडले. कोंबड्या फुकट देखील वाटण्याची वेळ व्यवसायिकांवर आली. रत्नागिरी भागात कमी अधिक प्रमाणात हे चित्र पाहण्यास मिळत होते. पोल्ट्री व्यवसायाला घरघर लागली. दुसरी गोष्ट अशी होती की  लॉकडाऊनच्या सुरूवातीला मासळी किंवा अन्य मत्स्य पदार्थ मिळणेही मुश्किल झाले होते. हीच वेळ आणि संधी होती संकटातून उभे राहण्याची. तालुक्यात गावागावांत उभारलेल्या बचत गटाच्या चळवळीतील पुढाकार घेतला. ‘उमेद'च्या माध्यमातून त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केले होते. लॉकडाऊनच्या काळात व्यावसायिक कोंबड्या व चिकनबद्दल अनेक गैरसमज तयार झाले होते. अशावेळी अनेक ग्राहकांनी महिला बचच गटांकडील गावरान कोंबड्यांकडे आपला मोर्चा मिळवला.  दोन पैसे जास्त मोजून ग्राहक या कोंबड्या खरेदीसाठी तयार झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोंबडी विक्रीतून ६१ लाखांचे उत्पन्न  
संगमेश्वर तालुक्यात सात प्रभाग आहेत. बचत गटांच्या महिला गिरीराज, वनराज आणि देशी कोंबड्यांचे (कावेरी) संगोपन करीत होत्या. यातील सुमारे २६०० महिलांकडे ३३ हजार १६६ पिल्ले वाढीसाठी आणली गेली होती. एकूण वर्षाचा विचार केल्यास या कोंबड्यांच्या विक्रीतून सुमारे साडे ६१ लाख रूपयांचे एकूण उत्पन्न मिळाले. तर त्यातील नफा ३५ ते ४० लाख रूपये मिळाला. पैकी लॉकडाऊनच्या काळात कोंबड्यांच्या विक्रीतून सुमारे २० ते २५ लाख रूपयांचे उत्पन्न या महिलांना मिळाले. 
त्यास २५० रूपये प्रति नग हा सरासरी दर मिळाला. तर काही वेळा तो ४५० ते ६०० रूपयांच्या घराचही गेला. लॉकडाउन काळात तालुक्यातील शेतकऱ्यांकडील कलिंगडे, अन्य फळे तसेच बचत गटांकडील अन्य उत्पादनांच्या विक्रीत अडथळे निर्माण झाले होता. अशा परिस्थितीत कोंबड्यांची विक्री मोठा आर्थिक आधार देणारी व आत्मविश्‍वास वाढवणारी ठरली. 

विक्रीची संधी पुढेही कायम 
उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक व विस्तार अधिकारी हिंदुराव गिरी म्हणाले की 
अद्याप सुमारे आठहजार कोंबड्या शिल्लक आहेत. तसेच नवी तेवढीच बॅच उपलब्ध होणार आहे. मागणीही वाढलेली आहे. त्यामुळे पुढेही महिलांना फायदा होत राहणार आहे. प्रति कोंबडी प्रति बॅचमध्ये सुमारे दीड किलोची व कोंबडा दोन किलो वजनाचा झाल्यानंतर त्याची विक्री करण्यात येते. 

आमच्या तालुक्यात सदस्य महिलांची संख्या सुमारे २२ हजार एवढी आहे. पैकी २६०० जणींनी कोंबडी विक्री यंत्रणेत सहभाग नोंदवला. 

हेही वाचा : लॉकडाउनच्या काळातही ''या'' बहाद्दराने केली कोट्यवधीची उलाढाल; संधीचं केलं सोनं 

असे केले मार्केटिंग  
लॉकडाऊनच्या काळात चिकन-मटणची विक्री बंद होती. त्यावेळी गावांमधून कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी येत होती. तालुक्यातील ओझरे येथील ज्योती जाधव यांनी अशावेळी प्रभावी मार्केटिंग केले. 
त्यांच्याकडे सुमारे दोनशे कोबड्या होत्या. त्यांनी व्हॉटस ॲपच्या मदतीने जाहिरात केली. 
त्याला परिसरातील गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. कोंबड्या हातोहात खपल्या. त्यातून सुमारे ३२ हजार रूपयांचे उत्पन्न हाती आल्याचे ज्योती यांनी सांगितले. त्यांच्या अखत्यारित सुमारे तेरा गट येतात. त्यांनाही या प्रकारे विक्री यंत्रणा राबविण्याची सूचना केली. त्यानुसार या गटातील महिलांनी देखील त्याचे अनुकरण केले. त्यांनाही अपेक्षित परिणाम मिळाले. 

असे केले पोल्ट्री व्यवसायाचे नियोजन  
-सुमारे शंभर कोंबड्यांचा एक गट होता. चार महिन्यांच्या बॅचचा पिल्ले, औषधे व खाद्य असा एकूण खर्च सोळा हजार रुपये अपेक्षित होता. 
-एका दिवसाचे पिल्लू २५ रुपये तर एक महिन्याचे पिल्लू १०० रुपये दराने महिलांनी विकत घेतले. -पालीतील विक्रेत्यांकडून कोंबड्यांसाठी आवश्यक खाद्य आणले गेले. त्यांना वेळोवेळी औषधे दिली जात होती. त्यामुळे मरतुकीचे प्रमाणे अत्यंत कमी राहिले. 
-सावर्डा, संगमेश्‍वर व इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील हॅचरीमधून पिल्ले आणली गेली. 

 

लॉकडाऊन काळात व्हॉट्स ॲप ग्रूपच्या माध्यमातून कोंबड्यांची केलेली जाहिरात प्रभावी ठरली.  त्यास ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. संकटाच्या काळात सुमारे दोनशे कोंबड्यांची झालेली विक्री समाधानकारक अनुभव देऊन गेली. अन्य महिलांनाही पुढे हाच अनुभव आला. ओझरे प्रभागातील तेरा गटांनी विक्री केली असून अजून पाच हजार पिल्लांची ऑर्डर नव्याने मिळाली आहे.  
- ज्योती जाधव, ओझरे,   बचत गट सदस्या, जि. रत्नागिरी, ता. संगमेश्वर 
संपर्क- ९४०३०९९३०४ 

उमेद अंतर्गत कुकूटपालन व्यावसायाला चालना देण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वीच आम्ही या व्यवसायास सुरूवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात गावांमधून कोंबड्यांना मागणी आल्यामुळे संकटात मिळालेले उत्पन्नाचे साधन आमच्यासाठी महत्वाचे ठरले.  
- मधुरा भोपळकर,  साडवली, सदस्या, जय सदगुरू बचत गट, ता. संगमेश्‍वर 
संपर्क- ८३७९९०१५३७ 

महिला स्वयंप्रेरणेने पुढे येऊन स्वतः मागणी नोंदवून घेणे, माल उपलब्ध करणे, खाद्य खरेदी करणे, विक्री व्यवस्था सक्षमपणे हाताळणे आदी बाबी कुशलपणे करू लागल्या आहेत. शाश्वत उपजीविका म्हणून या व्यवसायाकडे आम्ही पाहात आहोत. उमेद अंतर्गत ग्रामसंघ कार्यरत आहे. त्यात प्रत्येक महिन्याला  बैठका होतात. त्यातून बचत गटाच्या महिला आपापल्या उत्पादनांचे मार्केटिंग करतात.  कोंबड्यांच्या विक्रीत हीच पध्दत महत्वाची ठरली. 
-हिंदुराव गिरी, विस्तार अधिकारी व अभियान व्यवस्थापक संगमेश्वर तालुका 
संपर्क- ९४०३५०६४८६ 



No comments:

Post a Comment