महाराष्ट्रात आजघडीच्या प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये वरपूड (जि.परभणी) येथील चंद्रकांत देशमुख यांचे नाव अग्रभागी आहे. भविष्यात महाराष्ट्राच्या शेतीला आकार देणाऱ्या पहिल्या दहा शेतकऱ्यांच्या यादीत त्यांचा समावेश करावा लागेल, एवढं त्यांचं कर्तुत्व आहे. अलिकडेच, या लौकिकाला साजेशी कामगिरी नोंदवत सहा एकरात ७० क्विंटल उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन त्यांनी घेतलं आहे. खास बाब अशी, की देशाची खरीप हंगामातील सोयाबीनची प्रति हेक्टरी उत्पादकता आहे केवळ एक टन. त्या तुलनेत देशमुख सरांनी उन्हाळी हंगामात हेक्टरी २.९ टनापर्यंत मजल मारली आहे. म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत १९० टक्के जास्त उत्पादकता त्यांनी गाठली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सोयाबीनसाठी उन्हाळी हंगामाच्या तुलनेत खरीप हंगाम अनुकूल मानला जातो. याबाबत देशमुख सरांनी सर्व कृषी विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्थांना पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. कृषी विस्तार यंत्रणांना या पिकाच्या ऐतिहासिक वाटचालीची आठवण करून दिली आहे. माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या पुढाकारातून देशात, महाराष्ट्रात १९७०-८० च्या दशकात सोयाबीन रूजले. हे पीक मूळचे अमेरिका खंडातील.अण्णासाहेबांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या शेतीतील सकारात्मक कृषी परिवर्तनाची प्रागतिक चळवळ जणू काही खंडीत झाली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अण्णासाहेबांच्या प्रयत्नांनी सोयाबीनची आपल्याकडे रूजवात झाली, त्यावेळी खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात सोयाबीनचे प्रयोग सुरू होते. डॉ. व्ही. एम. राऊत यांच्यासारखे पीक शास्त्रज्ञ विस्तार कामासाठी पुढाकार घेत होते. तथापि, नव्वदच्या दशकात तत्कालीन सांसर्गिक पीक -रोगांना रोखण्याचे निमित्त काढून उन्हाळी हंगामातील सोयाबीन विस्तार कार्यक्रमातून बाद करण्यात आले. आपल्या कृषी विस्तार यंत्रणांनी पुन्हा त्याकडे कधी फिरून पाहिले नाही.पण, आज उन्हाळी हंगामाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. कारण खरीप हंगामात या ना त्या कारणामुळे नापिकी, उत्पादकता घटीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. या वर्षी भूजलाची प्रचंड उपलब्धता होती. सक्रांतीनंतर जर विस्तार यंत्रणांनी उन्हाळी सोयाबीनवर भर दिला असता, तर आज लेट कांद्याला चांगला पर्याय मिळाला असता.
सोयाबीनची महत्ता
जगाच्या अर्थ-राजकारणात क्रुड ऑईलनंतरची सर्वाधिक मोलाची कमोडिटी म्हणून सोयाबीनची ओळख आहे. व्यापार युद्धात सोयाबीनचा उपयोग हत्यारासारखा केला जातो. अलिकडील काळात इराणवरील अमेरिकाप्रणित निर्बंध आणि चीन-अमेरिका व्यापार युद्धात याचा प्रत्यय आला आहे.
- खाद्यतेल, जैवइंधन उद्योगात सोयाबीनला महत्त्वाचे स्थान.
- पोल्ट्रीसह पशुखाद्यात अव्वल प्रथिनांचा स्त्रोत म्हणून उपयोग.
- भारतात सोयामिलच्या एकूण उत्पादनातील ९० टक्के वाटा पोल्ट्री खाद्यासाठी वापरला जातो.
- चालू वर्षांत जगात ३४ कोटी टन सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज.
- ब्राझील (१२.६ कोटी टन), अमेरिका (९.६ कोटी टन), अर्जेंटिना (५.५ कोटी टन) अशी वर्गवारी.
- भारतात जेमतेम ०.८ कोटी टन (८० लाख टन) सोयाबीन उत्पादन.
भारत पिछाडीवर
- एकूण जागतिक सोयाबीन उत्पादनात भारताचा वाटा जेमतेम तीन टक्के.
- चीन सारखा शेजारी देश सुमारे ९ कोटी टनापर्यंत सोयाबीन अमेरिका खंडातून आयात करतो.
- चीनची सोयाबीनची एकूण वार्षिक गरज ११ कोटी टन.
- चीनचे देशांतर्गत उत्पादन केवळ पावणे दोन कोटी टन.
- आग्नेय आशियायी देश सुमारे पावणे दोन कोटी टन सोयामिल आयात करतात.
- एकूणच आशियायी व्यापारात भारतातसाठी अपार संधी आहे.
राजकीय इच्छाशक्ती हवी
मध्यंतरी चीनने भारतातून सोयामिल आयातीसाठी चाचपणी सुरू केली होती, पण अद्याप त्यात प्रगती दिसली नाही. चीनसह आशियातील सोयाबीनमधील व्यापार संधी साधायच्या असतील, तर सर्वप्रथम राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. कारण आजघडीला भारतात खाद्यतेलाची स्थापित गाळप क्षमता ३०० लाख टनाची असताना, निम्मी क्षमता देखिल वापरात येत नाही. कारण, पुरेशा प्रमाणात उत्पादन व आवक नसते. एक लाख कोटी रूपयांहून अधिक रक्कम खर्च करून सुमारे दीड कोटी टन खाद्यतेल भारतात आयात होते. म्हणजे, भारतातील शेतकरी, तेलगिरण्यांत काम करणारे मनुष्यबळ घरी बसवून बाहेरच्या लोकांना आपण काम पुरवतोय. हे थांबणे आवश्यक आहे. सोयाबीनसह भारतीय तेलबियांची उत्पादकता कमी असल्याने निर्यातीसाठी योग्य पडतळीत आपण पुरवठा करायला कमी पडतोय, म्हणून दिवसेंदिवस तेलबियांच्या डीओसी किॆंवा ढेपेचे मार्केट आपण गमावत आहोत.
अशा निराशाजनक वातावरणात चंद्रकांत देशमुखांसारखे शेतकरी उन्हाळ सोयाबीनचा यशस्वी प्रयोग नोंदवत सर्वांना दिशा दाखवत आहेत. एकाच वेळी खाद्यतेलाची आयात थांबवणे आणि सोयामिल निर्यातीवृद्धीतून हजारो कोटी रुपये अर्थव्यवस्थेत खेळवण्याची क्षमता सोयाबीन पिकात आहे. म्हणून, देशमुख सरांच्या यशस्वी प्रयोगाचे महत्त्व केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नाही. कोरोनानंतर शहराकडून गावाकडे होणारे स्थलांतर, येऊ घातलेली आर्थिक महामंदी, बेरोजगारीचा उच्चांक आणि रब्बीतील काही पिकांची पुरवठावाढ या पार्श्वभूमीवर उन्हाळी सोयाबीनच्या रूपाने एक नवे मॉडेल उदयाला येऊ शकते. शेतकऱ्यांची नवी पिढी हे मॉडेल नक्की पुढे नेईल.
सोलर आधारित तुषार सिंचन
चंद्रकांत देशमुख हे सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकरी आहेत. जगभरात सुरू असलेल्या सूक्ष्मसिंचन विषयक प्रयोगांचा ते अभ्यास करतात आणि लगेचच आपल्या शेतात प्रात्याक्षिके घेतात. त्यातून भारतीय हवा-पाण्यानुसार शाश्वत मॉडेल विकसित करतात. सोयाबीनबाबतही त्यांनी असेच केले आहे. उन्हाळ्यात सोलर आधारित तुषार सिंचनात - जसे जसे तापमान वाढत जाईल, त्याप्रमाणात प्रेशर संतुलित करून पाणी दिले जाते. ऐन उन्हात फॉग, धुके तयार करून सोयाबीनची पाने ओले राहतील, अशी पद्धत बसवली आहे. उन्हाळी सोयाबीन यशस्वी झाले याचे श्रेय चांगले बियाणे, पीकसंरक्षण आदी बाबींनाही आहे. मला तुषार सिंचनातले कळते, इतर बाबतीत मी शास्त्रज्ञांचा सल्ला घेतो, असे देशमुख सांगतात.
संक्रातीनंतर लागवड झालेल्या कांद्याचा खर्च, पिकाची उत्पादकतेबाबची दुदर्शा, आजची बाजारभावाची परिस्थिती आपल्या समोर आहे. याशिवाय, पाण्याची व मानवी श्रमांची नासाडी झाली. म्हणून, संक्रांतीनंतर लेट कांद्याऐवजी सोयाबीन पर्याय किती उजवा आहे, हे अनुभवी-जाणत्या शेतकऱ्यांच्या लक्षात येईल.
(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)
No comments:
Post a Comment