Pages - Menu

Wednesday, May 6, 2020

औरंगाबादमधील ‘या’ कंपनीने लॉकडाऊनमध्ये १२१ टन शेतमालाची विक्री

कोरोना व लॉकडाऊनच्या संकटात औरंगाबाद स्थित ‘कृषीसमर्पण ॲग्रो प्रोड्यूसर’ या शेतकरी कंपनीने औरंगाबाद, जालना व नगर अशा तीन जिल्ह्यांत मिळून फळे व भाजीपाल्यांची नियोजनबद्ध विक्री व्यवस्था उभारली. त्यातून १२१ टन मालाची दणदणीत यशस्वी विक्री साधली.  त्यातून सुमारे २५ शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळण्याबरोबर मोठा आर्थिक आधारही मिळाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना लॉकडाऊनच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री अडचणीत आली. यात सर्वाधिक फटका बसला तो फळे व भाजीपाला पिकांना. व्यापारी कवडीमोल दराने शेतमाल मागू लागले. अशा दुर्दम्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्थेची सूत्रे आपल्या हाती घेत शहरे, महानगरांमधून मोठी उलाढाल केली. औरंगाबाद येथे कृषी समर्पण ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. डॉ. विनायक शिंदे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, जि. औरंगाबाद येथे ते साहायक प्राध्यापक आहेत. यंदाच्या फेब्रुवारीत संस्थेने ‘कृषीसमर्पण ॲग्रो प्रोड्यूसर’ नावाने शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. डॉ. सारिका विनायक शिंदे कंपनीच्या अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांना कंपनीत सहभागी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात कंपनीने तीन जिल्ह्यांत फळे व भाजीपाल्याची नियोजनबद्ध थेट विक्रीव्यवस्था उभारत शेतकऱ्यांना बाजारपेठ व आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

‘कृषी समर्पण’ कंपनी- विक्री व्यवस्था दृष्टिक्षेपात  
-विक्रीचे तीन मुख्य जिल्हे- औरंगाबाद, जालना व नगर 
-मालाची विक्री झालेल्या शेतकऱ्यांची संख्या- २५ 
-औरंगाबाद येथे फ्रूट बास्केट विक्री संख्या- ३३३१ 
-भाजीपाला बास्केट संख्या- २६३ 
-तीनही जिल्ह्यात फळे व भाजीपाला मिळून झालेली विक्री- १२१ टन 

लॉकडाऊनच्या काळात ''या'' दोघा युवा बंधूंनी केला यशस्वी प्रयोग 

फळांची विक्री(कंसात दर प्रति किलो) 

औरंगाबाद 
मोसंबी- १७. ५ टन ( ३५ रुपये) 
द्राक्षे- २५ टन ( ५० रू.) 
कलिंगड- १३.५ टन (१५ रू.) 
खरबूज- ५.५ टन (४५ रू.) 
हापूस आंबा- ५०० किलो (२२० रुपये) 
-औरंगाबाद कृषी विभागांतर्गत ८०० किलो कांदा विक्री 

नगर  
येथे बास्केटच्या रूपात न विकता खातगाव टाकळी व हिवरेबाजार येथे काकडी, मिरची, वाटाणा, कोबी, कोथिंबीर, मेथी, आदींची एकूण सहा टनांपर्यंत थेट विक्री झाली. 

फळांची विक्री 
कलिंगड- २७ टन 
संत्रा- ४ टन 

जालना 
-येथे केवळ भाजीपाल्यांची विक्री (१,७७२ बास्केट्स) 
-यात दोन शेतकऱ्यांच्या मालाचा समावेश. 
झालेली विक्री 
काकडी- ८ टन, 
मिरची- २ टन 
गवार-८०० किलो 
कांदा- साडेचार टन 

होलसेल विक्री  
याशिवाय राज्याच्या काही भागांमधून मागणी येत होती. त्यात भुसावळ येथे तीन टन तर मनमाड येथे २ टन मोसंबी व्यापाऱ्यांना पाठवण्यात आली. 

शेतकऱ्यांनी विकला पावणे आठ कोटींचा भाजीपाला

विक्रीचे नियोजन  
विक्री व्यवस्था व विपणन समन्वयाची जबाबदारी सांभाळणारे कंपनीचे संचालक डॉ. विनायक शिंदे म्हणाले की आम्ही कंपनीचा लोगो व मालाची वैशिष्ट्ये असलेली आकर्षक जाहिरात तयार केली. आमचे व्हॉटस ॲप, फेसबूक व टेलिग्राम यांचे मोठे नेटवर्क आहे. त्यावरून मालाचे प्रमोशन केले. ग्राहकांकडून ऑर्डर्स येण्यास सुरुवात झाली. औरंगाबाद शहरात ६० टक्के विक्री निवासी सोसायट्यांमधूनच केली. ग्राहकांकडून ऑर्डर्स घेतल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना त्याबाबत कळवले जायचे. त्यानुसार मालाची काढणी, प्रतवारी व पॅकिंग करून ते माल पाठवण्याची व्यवस्था करायचे. औरंगाबाद पासून जवळच्या  बिडकीन येथे ‘कलेक्शन सेंटर’ ठेवले होते. त्यामुळे वितरणाला अडचण आली नाही. शेतकऱ्यांनाही मालविक्रीनंतर त्वरित ‘पेमेंट’ दिले जायचे. ‘कृषीसमर्पण’चे सचिव बालचंद घुनावत, औरंगाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी.एस. मोटे यांचे सहकार्य लाभले. 

संपर्क- डॉ. विनायक शिंदे- ७०७१७७७७६७ 
-------------------------------------------------------------

शिंदेंनी जागेवर विकली कलिंगडे, संत्री  
टाकळी खातगाव (ता. जि. नगर) येथील अविनाश शिंदे यांची दोन एकरांतील कलिंगडे विक्रीस तयार होती. लॉकडाऊन काळात किलोला पाच रुपये दराने ते मागणी करीत होते. कृषीसमर्पण संस्थेने  त्यांना घराजवळ स्टॉल उभारून थेट विक्रीचा सल्ला दिला. आरोग्यसुरक्षिततेचे नियम पाळताना खरेदी-विक्रीत मालाला व पैशांना मानवी संपर्क कमीतकमी होईल यादृष्टीने सूचना केल्या. शिंदे यांनी स्टॉलभोवती वाहनांचे कुंपण उभारून तो भाग क्वारंटाईन होईल असा प्रयत्न केला. ग्राहकांकडून पैसे घेताना चिमट्यांचा वापर केला. काठी व त्यावर क्रेट टांगून त्यात ग्राहकांना पैसे ठेवण्यास सांगण्यात आले. 

कलिंगडे थेट ग्राहकाच्या हाती न देता बाजल्यांवर ठेवली जायची. सुमारे २७ टन कलिंगडांची १२ रुपये प्रति किलो दराने दणदणीत विक्री करण्यात शिंदे यांना यश मिळाले. 

संत्र्यांचीही विक्री  
शिंदे यांचा दोन एकर संत्राही होता. त्याची किलोला ३० रुपये दराने चार टन विक्री झाली. सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचे एकूण उत्पन्न हाती आले. शिंदे दिवसभर स्टॉलजवळ थांबायचे. मित्र, व्हॉटस ॲप ग्रूप यांच्या मदतीने विक्रीसाठी प्रयत्न केले. 

अविनाश शिंदे- ९६२३७७८२९४ 

-------------------------------------------------------------

राजपुतांच्या मोसंबीला मागणी 
खापरखेडा (ता. वैजापर, जि. औरंगाबाद) येथील इश्‍वर राजपूत यांची सुमारे अडीच एकर मोसंबीची बाग यंदा काढणीस आली. व्यापाऱ्याने साडेपाच लाख रूपयांत बाग मागितली. मात्र लॉकडाऊन सुरू झाला आणि सारी चक्रेच पालटली. व्यापारी किलोला दोन ते तीन रुपये इतक्या कवडीमोल दरांत मोसंबी मागू लागले. राजपूत अत्यंत निराश झाले. यंदा ३५ टन एकूण उत्पादनाची अपेक्षा होती. आता करायचे काय हा गंभीर प्रश्‍न समोर उभा राहिला. मोसंबी बांधावर टाकून देण्याच्या स्थितीत ते आले. कृषी समर्पण गटाचे ते सदस्य आहेत. तुम्ही माल पाठवा, आमची टीम तुम्हांला विक्रीत मदत करेल असे त्यांना गटाने आश्‍वासन दिले. त्यानुसार औरंगाबाद येथील निवासी सोसायट्यांसाठी सुरुवातीला ५०० किलो माल पाठवला. तो पहिल्यादिवशीच संपला. मग हुरूप वाढला. दररोज काढणी, शेतातच ग्रेडिंग, पॅकिंग करून माल पाठवणे सुरू केले. म्हणता म्हणता किलोला ३५ ते ४० रुपये दराने साडेतीन टन मोसंबीची विक्री झाली. 

पुढे लॉकडाऊनचे नियम अजून कडक झाले. विक्रीच्या वेळा कमी झाल्या. मग कृषी समर्पण गटाने बांधावर व्यापारी पाठवण्यास मदत केली. तिथे २० ते २५ रुपये दर मिळाला. एकूण विक्रीतून लॉकडाऊन संकटाच्या काळात सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले याचे समाधान मिळाल्याचे राजपूत म्हणाले. 

इश्‍वर राजपूत- ८०८७८७८४८० 



No comments:

Post a Comment