पुणे : राज्यातील टोमॅटोखालील महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये तीन विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळला आहे. यात कुकूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही), ‘जीबीएनव्ही’ व टोमॅटो क्लोरोसीस’ या रोगांचा समावेश असल्याची माहिती, बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेतील (आयआयएचआर) वनस्पती विषाणूतज्ज्ञ डॉ. एम. कृष्णा रेड्डी यांनी दिली आहे. तसेच टोमॅटोवर सध्या दिसत असलेल्या रोगग्रस्त पिकाच्या छायाचित्रांवरून तो ‘सीएमव्ही’ असण्याची शक्यता आहे, मात्र, या पिकाच्या नमुन्यांचे शास्त्रीय परीक्षण केल्यानंतरच रोगाचे अधिकृत निदान करणे शक्य होईल, असे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दरम्यान, एरवी झाडांवर आढळणारा सीएमव्ही रोग अलीकडे फळांवर मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. त्याचे प्रमाणही पूर्वीच्या तुलनेत वाढू लागल्याचे निरीक्षण डॉ. रेड्डी यांनी नोंदवले आहे. सध्या चर्चेत असलेला व परदेशात आढळणारा टोमॅटो ब्राऊन रुगोस फ्रूट व्हायरस रोग आजमितीस तरी भारतात आढळल्याचे शास्त्रीय पुरावे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात नगर, संगमनेर, अकोले, फलटण, पुणे, सातारा, पाडेगाव हे महत्त्वाचे टोमॅटो पट्टे आहेत. या पट्ट्यांमध्ये उन्हाळी टोमॅटो काढणी व विक्रीच्या अवस्थेत आहे. लॉकडाऊनचे संकट, घसरलेले दर, अशातच टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. टोमॅटो पिवळा पडणे, आकार वेडावाकडा होणे, तपकिरी, लालसर चट्टे दिसणे अशी विविध लक्षणे दिसत असून हा अज्ञात विषाणूजन्य रोग असल्याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेतील (आयआयएचआर) वनस्पती विषाणूतज्ज्ञ व वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. कृष्णा रेड्डी म्हणाले, की लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच्या काळात महाराष्ट्रातील रोगग्रस्त टोमॅटोच्या जेवढ्या नमुन्यांचे आम्ही शास्त्रीय परीक्षण केले, त्यामध्ये कुकूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) या रोगाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ७० टक्के आढळले आहे. या रोगाचा प्रसार माव्याद्वारे होतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्याकडे रोगग्रस्त झाडाचे नमुने लॉकडाऊनपूर्वी तपासणीसाठी पाठवले, त्यातही हाच रोग प्रामुख्याने आढळला. महाराष्ट्रात किंवा देशात हा रोग मर्यादितपणे अस्तित्वात होता. अलीकडील काळात त्याचे प्रमाण व तेही फळांवर वाढू लागले आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात ‘ग्राऊंडनट बड नेक्रॉसीस व्हायरस’ (जीबीएनव्ही- टॉस्पोव्हायरस) रोगाचे सुमारे २० ते ३० टक्के तर १० टक्के प्रमाण टोमॅटो क्लोरोसीस व्हायरस या रोगाचे आढळले आहे. ‘जीबीएनव्ही’ रोग फुलकिड्यांमार्फत तर ‘क्लोरोसीस’ हा पांढऱ्या माशीद्वारे प्रसारित होतो.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
`सीएमव्ही’चा प्रादुर्भाव फळांवर वाढतोय
डॉ. रेड्डी म्हणाले की पिकात कधी एक, दोन तर तीनही रोग एकत्र आढळतात. त्यामुळे त्वरित लक्षणे ओळखणे व अचूक निदान करणे अवघड असते. रोप लावल्यानंतर एक महिन्याच्या काळात संबंधित रोगाचा वाहक असलेल्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यानंतर लक्षणे दिसायला दोन महिन्यांचा कालावधी लागतो. पूर्वी सीएमव्ही रोगाची लक्षणे मुख्यत्वे झाडावर दिसून यायची. अलीकडील काळात फळांमध्येच त्याची प्रामुख्याने लक्षणे दिसत आहेत. हा बदल अत्यंत महत्त्वाचा असून त्यामागील शास्त्रीय कारणांचा अभ्यास सुरू आहे. मिरेवाडी (जि. सातारा) येथील एका टोमॅटो उत्पादकाच्या सद्यःस्थितीतील रोगग्रस्त टोमॅटोची छायाचित्रे अभ्यासली असता तो ‘सीएमव्ही’ असण्याची शक्यता डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केली. मात्र नमुन्यांचे प्रयोगशाळेत परीक्षण केल्यानंतरच त्याची शास्त्रीय सिद्धता होईल असे ते म्हणाले.
‘पिकाचे नमुने बंगळूरला पाठविणार’
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सुमारे पाच शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या पथकाने बुधवारी (ता. ६) नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले भागातील नुकसानग्रस्त टोमॅटो क्षेत्राची प्रत्यक्ष शास्त्रीय पाहणी केली. यावेळी संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे देखील उपस्थित होते. याविषयी बोलताना कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. संजय कोळसे म्हणाले की आम्ही सुमारे २० ते २२ शेतकऱ्यांच्या प्लॉटला भेट देऊन रोगाची लक्षणे जाणून घेतली. यात फळे कडक होणे, न पिकणे, त्यावर पांढरट, हिरवे, पिवळट चट्टे दिसणे अशा लक्षणांचा समावेश आहे. काही ठिकाणी शेंडे पिवळसर दिसत आहेत. एखाद्या नव्हे तर विविध वाणांवर प्रादुर्भाव दिसतो आहे. हा रोग नेमका कोणता आहे हे केवळ लक्षणांवरून सांगणे शक्य नाही. तथापि रोगग्रस्त नमुने संकलित केले आहेत. बंगळूर येथील ‘आयआयएचआर’ संस्थेकडे ते निदान करण्यासाठी पाठवणार आहोत. मात्र लॉकडाऊनमुळे कुरिअर सेवेत समस्या येत आहेत. तरीही तातडीने ही प्रक्रिया सुरू करणार आहोत.
0 comments:
Post a Comment