Monday, May 18, 2020

ऑनलाइन सौद्यात हळदीची ४६.३८ कोटींची उलाढाल; ७९ हजार क्विंटलची विक्री 

सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑनलाइन सौद्यांद्वारे पंधरवड्यात ७९ हजार ७०४ क्विंटल हळदीची विक्री झाली असून ४६ कोटी ३८ लाख ७७ हजार २८० रुपयांची उलाढाल झाली आहे. बाजार समितीच्या आवारात हळीदीची दररोज २० हजार पोत्यांची आवक होत असून आवक देखील वाढली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी देशात प्रसिध्द आहे. त्यामुळे इथल्या बाजारपेठेत स्थानिक, हळदीबरोबर आंध्रप्रदेश, कर्नाटक, यासह अन्य राज्यातून हळद विक्रीसाठी शेतकरी येतात. हळदीची वर्षाकाठी सहाशे कोटींची रुपयांची उलाढाल होते. २० जानेवारीला नव्या हळदीच्या सौद्यांना प्रारंभ झाला. हळदीची आवक कमी अधिक होती. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळदीच्या आवकीत वाढ झाली होती. परिमाणी दरात चढ उतार असल्याने शेतकऱ्यांनी हळद विक्री करण्याचे काही प्रमाणात थांबवले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, २२ मार्च पासून लॉकडाऊनला सुरवात झाली. त्याचा फटका बाजार समितींना बसला. बाजार समितीतील सौदे बंद करण्यात आले होते. त्यामुळे हळदीचे सौदे जवळपास ५० ते ५५ दिवस काढलेच नाही. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात नव्या हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते. यंदा याच कालावधीत उलाढाल थांबली. त्यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे आणि बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने ई-नामद्वारे सौदे करण्याचा निर्णय घेतला. २९ एप्रिल पासून हळदीचे सौदे सुरु झाले. या ऑनलाइन सौद्यांना व्यापारी अडते आणि शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 

प्रयोगशील शेतकरी यांनी पारंपारिक शेतीपद्धती बदलून फळबागेतून लाभले आर्थिक स्थैर्य

बाजार आवारात दरोरज २० हजार हळदीच्या पोत्यांची आवक सुरु आहे. सध्या हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार रुपये इतका दर आहे. ऑनलाईन सौदे सुरु झाल्यापासून हळदीची ४६ कोटी ३८ लाख इतकी उलाढाल झाली आहे. दरम्यान, २० जानेवारी ते २० मार्च पर्यंत साडे चार लाख क्विंटल हळदीची आवक झाली होती. या हळदीची विक्री झाली असून २०९ कोटींची तर गेल्या पाच महिन्यात सुमारे २५५ कोटी इतकी हळदीची उलाढाल झाली आहे. 

ऑनलाइन सौदे घेण्याचा निर्णय योग्य आहे. सौदे बंद असते तर हळदीच्या दरात घसरण झाली असती. सौदे सुरु केल्याने शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडतील. शेतकऱ्यांमध्ये ऑनलाईन सौद्याबद्दल जागृती झाल्याने फायदा होत आहे. कोणतीही भीती न बाळगता हळद, बेदाणे ऑनलाइन सोद्यासाठी घेवून यावे. 
- दिनकर पाटील, सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती 



0 comments:

Post a Comment