Wednesday, February 26, 2020

अचूक सिंचनासाठी स्वयंचलित यंत्रणा

स्वयंचलित सूक्ष्म सिंचन यंत्रणेद्वारे (ऑटोमेशन) पिकांसाठी पाण्याचे अचूक व्यवस्थापन करता येते. अलीकडे कमी किमतीमध्येही कंट्रोलर्स मिळतात. याचबरोबरीने आपल्या क्षेत्राच्या गरजेनुसार विविध सेंन्सर्सचा उपयोग करता येणारे कंट्रोलर उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानाचा वापर पिकाच्या गरजेनुसार पाणी देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

पिकांना सिंचन करण्यासाठी मोकाट सिंचन पद्धती, सरी वरंबा, लांब सरी, वाफे पद्धती, आळे पद्धती आणि आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये तुषार सिंचन पद्धती आणि ठिबक सिंचन पद्धतींचा अवलंब केला जातो. पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये पाणी वापर कार्यक्षमता ३० ते ४० टक्के एवढी मिळते, म्हणजेच ६० ते ७० टक्के पाणी वाया जाते. पिकास खूप पाणी दिले म्हणजे पिकांचे अधिक जास्त उत्पादन मिळते या मानसिकतेमधून आता आपण बाहेर आले पाहिजे. 

वाफसा अवस्था महत्त्वाची  
पिकांच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. प्रत्येक अवस्थेत पिकांची पाण्याची गरज बदलत असते. पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये पिकाच्या अवस्थेनुसार पाणी किती द्यावे हे बऱ्याचदा कळत नाही. काही वेळा त्याबाबतची माहिती उपलब्ध होत नाही. तसेच  पाण्याचा कधी वापर करावा तेही कळत नाही. पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये दर १० दिवसांनी पाण्याची पाळी देण्यात येत असेल तर त्यामध्ये पिकांची वाढ फक्त ३ ते ४ दिवस उत्तम होते. पहिले ३ ते ४ दिवस पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये जादा पाणी असल्यामुळे ताणाखाली असते, तर शेवटच्या ३ दिवसांमध्ये दिलेले पाणी पिकांच्या मुळाखाली निघून गेल्यामुळे पिकास पाण्याचा ताण पडतो. म्हणून जादा पाणी पिकांना देऊनही उत्पादनात वाढ होत नाही. मधल्या ३ ते ४ दिवसांमध्ये पिकांची वाढ होते. या दिवसांमध्ये जमिनीमध्ये पिकांच्या मुळांजवळ पाणी, अन्नद्रव्ये, हवा उपलब्ध असते. जमिनीमध्ये पाणी आणि हवा यांचे संतुलन निर्माण झालेले असते. या अवस्थेला ‘वाफसा' अवस्था म्हणतात. म्हणजेच  पिकांचे अधिक उत्पादन आणि उत्तम गुणवत्ता मिळण्याकरिता पिकांच्या मुळांजवळ वाफसा अवस्था ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 

बऱ्याच वेळा वीज टंचाईमुळे शेतकरी पिकांच्या गरजेनुसार, अवस्थेनुसार ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन करताना दिसत नाही. त्यामुळे पाण्याचा अतिवापर होतो. पिकांच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार पिकांची पाण्याची गरज पूर्तता न केल्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाहीत. यासाठी ठिबक, तुषार सिंचन संचाचे तंत्रज्ञान पूर्णपणे समजून घेतले पाहिजे. पिकाची पाण्याची गरज किती, पाण्याची गरज कशी काढावी याचे गणित तज्ज्ञांकडून माहिती करून घ्यावे. पिकाची पाण्याची गरज काढल्यानंतर आपल्याकडील संचाद्वारे पाण्याची मात्रा पिकास देण्यासाठी संच किती वेळा चालवावा, हे ठरवावे. पाण्याच्या योग्य नियोजनाकरिता पिकाची पाण्याची गरज माहिती असणे गरजेचे आहे.

स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणेचा वापर  
    ठिबक आणि तुषार सिंचन तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात, कमी वेळेत, कमी विजेमध्ये, कमी मजुरांमध्ये अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणता येते. त्याचबरोबर उत्पादन अधिक मिळते. परंतु याकरिता पाण्याचे अचूक व्यवस्थापन शिकण्याची गरज आहे. 
    पाण्याचा पिकासाठी गरजेनुसार, अवस्थेनुसार कार्यक्षम वापर करता येणे शक्‍य आहे. याकरिता स्वयंचलीत ठिबक सिंचन यंत्रणाचा वापर उपयुक्त आहे. हे तंत्रज्ञान अतिशय सोपे आहे. सामान्य शेतकरी या तंत्राचा अवलंब करू शकतो. अलीकडे कमी खर्चाचे ऑटोमेशन कंट्रोलर्स उपलब्ध झाले आहेत. 
    स्वयंचलित ठिबक यंत्रणेद्वारे पिकासाठी अचूक पाणी व्यवस्थापन करता येते. या तंत्रज्ञानासाठी क्षेत्राची मर्यादा नाही. पॉलिहाऊस, शेडनेट खालील १० गुंठे क्षेत्रापासून ते कितीही एकर क्षेत्रासाठी स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणेचा वापर करता येतो.

स्वयंचलित ठिबक यंत्रणेचा उपयोग 
पंप सुरू करणे, ठिबक सिंचन संचामधील फिल्टर्स साफ करण्यासाठी, ठिबक सिंचन संचामधील शेतातील व्हॉल्व्ह चालू, बंद करण्याकरिता, ठिबक सिंचनमधून विद्राव्य खते देण्याकरिता, पॉलिहाऊस/ शेडनेटमधील फॉगर्स सुरू करण्यासाठी, जमिनीतील ओलावा नुसार सिंचनाकरिता पिकासाठी पाण्याचे अचूक व्यवस्थापनासाठी ही यंत्रणा फायदेशीर आहे.

फायदे 
    पाण्याचे अचूक व्यवस्थापन. 
    पिकांचे अधिक उत्पादन. शेतमालाची उत्तम गुणवत्ता.
    पाणी बचत होऊन कार्यक्षमता वाढते, 
    सूक्ष्म अन्नद्रव्य तसेच खतांचे अचूक व्यवस्थापन. खतांची कार्यक्षमता वाढते, खतांच्या वापरामध्ये बचत. 
    शेतामधील व्हॉल्व्ह यंत्रणा सुरू किंवा बंद करणे शक्य.
    रात्रीच्या वेळी पिकासाठी अवस्थेनुसार, गरजेनुसार सिंचन.
    कमी पाण्यात, कमी विजेत, कमी वेळेत अधिक क्षेत्रासाठी सिंचन शक्य.
    मजुरी खर्चामध्ये बचत. सिंचनाकरिता खतांच्या वापरामध्ये मानवी हस्तक्षेप कमी होऊन पिकांसाठी पाणी आणि खतांचे अचूक व्यवस्थापन.

जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन 
पाण्याचा सामू, विद्युत वाहकता (EC), आर्द्रता, हवामानमापक यंत्रणेतील विविध सेंसर्स उपलब्ध आहेत. त्यांचा शेतीमध्ये उपयोग होतो. 

- बी. डी. जडे, ९४२२७७४९८१ (वरिष्ठ कृषीविद्या शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव) 



0 comments:

Post a Comment