Wednesday, February 26, 2020

गूळ हंगाम अंतिम टप्प्यात

कोल्हापूर - यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत या सप्ताहात सुमारे चार लाख गूळ रव्यांची घट झाली आहे. गुळाच्या आवकेत घट झाली असली तरी दरात मात्र विशेष वाढ झाली नसल्याचे चित्र बाजार समितीत आहे. सध्या गुळाला क्विंटलला ३५०० ते ४२०० रुपये इतका दर मिळत आहे. येत्या पंधरा दिवसात गुळाचा हंगाम आटपण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

यंदा अंदाजापेक्षा एक महिना उशिरा गुळाचा हंगाम सुरू झाला. महापुरात अनेक प्लॉट पाण्याखाली गेल्याने याचा परिणाम गुळाच्या दर्जावरही झाला. पावसाचा जोर सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कायम राहिल्याने यंदा गूळ हंगाम लांबला आहे. गुऱ्हाळघरांचे मोठे नुकसान पुराच्या पाण्यामुळे झाले. परिणामी ज्या गुऱ्हाळमालकांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांनी यंदा गुऱ्हाळे बंद ठेवणेच पसंत केले. यामुळे जिल्ह्यात यंदा कशीतरी दीडशे ते दोनशे गुऱ्हाळघरे सुरू आहेत. सध्या गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज दहा ते पंधरा हजार गूळ रवे बाजार समितीत येत आहेत. आणखीन पंधरा दिवस तरी सध्या होणारी गुळाची आवक कायम राहील. यांनतर आवक घटून मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आवक अत्यल्प राहण्याची शक्‍यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली. सध्या मिळेल तेथून ऊस आणून गूळ तयार करण्यासाठी गुऱ्हाळ मालक धडपडत आहेत.

यंदा गुळाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी फारसा आशादायक गेला नाही. प्रत्येक वर्षी गुळाचा हंगाम संपत आला की व्यापाऱ्यांत गूळ खरेदीसाठी चढाओढ लागते. यामुळे दरात काहीशी वाढ होते. परंतू यंदा ही परिस्थिती दिसत नाही. मंदीच्या वातावरणामुळे व उठाव नसल्याने व्यापारी जेवढा लागेल तितकाच गूळ खरेदी करत आहेत. यामुळे दरात अपेक्षित वाढ होत नसल्याचे दिसत आहे.
- राजाराम पाटील, अध्यक्ष, शाहू गूळ संघ, कोल्हापूर



0 comments:

Post a Comment