सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. मात्र या पिकाचा दीर्घ कालावधी व तुलनेने मिळणारे उत्पन्न लक्षात घेता शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात असतात. सातारा जिल्ह्यात शिरगाव येथील मोहिते कुटुंबाने सुमारे चार वर्षांपासून वरुण अर्थात वाघ्या घेवड्याचे पीक घेण्यात सातत्य ठेवले आहे. वर्षभर या पिकाचे चार हंगाम घेत त्यातून आर्थिक बळकटी आणली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यातील शिरगाव हे सुमारे चार हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. गावातून तारळी नदी बारमाही वाहते. त्यामुळे ८० टक्क्यांहून अधिक क्षेत्र बागायती आहे. सातारा जिल्ह्यात आले, हळद या प्रमुख पिकांबरोबर ऊस व भाजीपाला ही पिकेदेखील अधिक प्रमाणात घेण्यात येतात. शिरगावातदेखील सर्वाधिक उसाचे पीक घेतले जाते. गावातील उदय पाडुंरग मोहिते यांच्या कुटुंबाची सुमारे चार एकर शेती आहे. बहुतांश शेती बागायती आहे. उदय आपले धाकटे बंधू शिरीष यांच्या साह्याने ती सांभाळतात. त्यांचे आशिष हे बंधू अन्य व्यवसाय करतात.
पीकबदल
पदवीधर झाल्यानंतर उदय यांनी सातारा येथे एका कंपनीत नोकरी केली. मात्र वेतन न परवडवणारे असल्याने त्यांनी शेतीतच लक्ष घालण्याचे ठरवले. मजूरटंचाईची समस्या लक्षात घेऊन त्यांनी ट्रॅक्टर व अवजारे भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यात हळूहळू स्थिरता येऊ लागली. त्याचबरोबर ताजे उत्पन्न मिळावे यासाठी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली. भाजीपाला मुंबई बाजारपेठेत घेऊन जाण्याच्या अनुभवातून घेवडा पिकाचे अर्थकारण लक्षात आले. हा पर्याय आपण वापरून पाहावा असे उदय यांना वाटले. मग त्याची सविस्तर माहिती घेतली.
घेवडा पिकाची शेती
कोरेगाव तालुक्यात घेवडा (राजमा) हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र शक्यतो खरीप हंगामात एकदाच हे पीक घेण्याची सर्वसाधारण पद्धती आहे. मात्र केलेल्या अभ्यासानुसार मार्केटमध्ये त्यास वर्षभर मागणी राहात असल्याने ते विविध हंगामात घेणे शक्य असल्याचे उदय यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यानुसार नियोजन सुरू केले. प्रथम २०१४ मध्ये जून महिन्यात ३० गुंठे क्षेत्रात तीन फुटी सरीवर लागवड केली.
त्यातून दीड टन उत्पादन मिळाले. सरासरी ३० रुपये प्रति किलो दर मिळाला. आश्वासक उत्पन्न मिळाल्याने पुढील प्रयोगासाठी ऊर्जा मिळाली. अन्य पिकांच्या तुलनेत कमी कालावधीत, कमी भांडवलात तसेच कमी कष्टात हे पीक फायदेशीर ठरू शकते, असे वाटले. मग क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला.
वर्षभर घेवड्याचे नियोजन
वर्षभर घेवडा घेण्याचे नियोजन करताना सुरुवातीला ऊस तसेच भाजीपाला पिकाचे क्षेत्र कमी कमी करत टप्प्याटप्प्याने घेवड्याच्या क्षेत्रात वाढ केली. मागील चार वर्षापासून प्रत्येकी दोन एकरांत लागवड केली जाते. वर्षभरात सुमारे चारवेळा हे पीक घेण्यात येते. उदय सांगतात की वर्षभर कोणत्याही हंगामात घेता येणे हे या पिकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
उन्हाळ्यात त्याचे उत्पादन तुलनेने कमी व हिवाळ्यात चांगले येते. हे पीक सुमारे अडीच ते तीन महिन्यात येते. वर्षातून चारवेळा घेताना जून १५ ते २० ऑगस्ट, २० ऑक्टोबर व दहा जानेवारी असे टप्पे पाडले जातात. प्रत्येक काढणीनंतर सुमारे एक महिना त्या क्षेत्राची मशागत करून विश्रांती दिली जाते. घेवड्यास पाणी जास्त झाले की खराब होण्याचा धोका असतो. यासाठी पावसाळ्यात प्लॅाटची अधिक काळजी घेतली जाते. शेतात पाणी साठू नये यासाठी शेतात चरी मारल्या जातात. गंधकाचा वापर या पिकात महत्त्वाचा ठरतो.
घेवडा शेतीतील ठळक बाबी
- शेणखत, लेंडीखताचा शेतात जास्तीत जास्त वापर होतो.
- प्रत्येक हंगामात दोन एकर क्षेत्र असते.
- तीन फुटी सरीवर सहा इंच अंतरावर टोकण असते.
- एकरी ४० किलो बियाण्याचा वापर होतो.
- या पिकात विशेषतः उन्हाळ्यात मायक्रो स्प्रिंकलरचा वापर फायदेशीर ठरतो.
- आवश्यकता असल्यासच कीडनाशकांचा वापर होतो.
- एकवेळ खुरपणी करून तणांचे नियंत्रण केले जाते.
- स्वतःच्या शेतातील दर्जेदार बियाण्याचा वापर होतो.
- उदय मोहिते, ८००७९९९३९९
No comments:
Post a Comment