मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत व्यवस्थापन करावे. वेलीसभोवती सातत्याने आच्छादन करावे. जायफळ कलमांना सुरवातीला दोन ते तीन वर्षे सावली करावी.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
काळी मिरी
मिरी वेलास पाणीपुरवठ्याची सोय करावी. आधाराचे झाड जर नारळ किंवा सुपारी असेल तर पाणीपुरवठा करताना विशेष अडचणी येत नाही. स्वतंत्रपणे लागवड करताना स्वतंत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी लागते. ठिबक किंवा मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करावा.
मिरीची वाढ जोमदार होण्यासाठी व चांगले उत्पन्न मिळण्यासाठी खताचा पुरवठा आवश्यक आहे. पूर्ण वाढलेल्या एका मिरीच्या झाडाला तिसऱ्या वर्षापासून दहा किलो शेणखत, १५० ग्रॅम नत्र, ७५ ग्रॅम स्फुरद, व १५० ग्रॅम पालाश द्यावे.
खताची ऑगस्ट आणि फेब्रुवारी महिन्यात विभागून द्यावी. लागवड केल्यावर पहिल्या वर्षी वरील मात्रेच्या एक तृतीयांश तर दुसऱ्या वर्षी दोन तृतीयांश मात्रा द्यावी. खत देण्यासाठी वेलापासून किमान ३० सें.मी अंतर सोडून १५ ते २० सें.मी रुंदीचा उथळ चर काढून त्यात खत द्यावे.
वेलीसभोवती सातत्याने आच्छादन ठेवावे. यासाठी आधाराच्या झाडांची गळून पडलेली पाने, गवत यांचा वापर करावा. आच्छादन केल्याने पाण्याची बचत होते, तण वाढत नाही आणि वेलाची वाढ अंत्यत चांगली होते.
मिरीच्या वेलांना झाडावर चढेपर्यंत सैल बांधावे. वेलांची उंची ५ ते ६ मीटरपेक्षा वाढू देऊ नये.
उत्पादन -
लागवड केल्यानंतर तीन वर्षानंतर उत्पादन सुरू होते. मिरीच्या एका वेलापासून सुमारे दोन ते तीन किलो वाळलेल्या मिरीचे उत्पादन मिळते. मिरीला मे-जून महिन्यामध्ये तुरे येतात. जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घोस काढण्यासाठी तयार होतात. हिरव्या मिरीचा वापर लोणचे निर्मितीसाठी करतात.
घोसामधील १ ते २ मणी पिवळे
अगर नारंगी झाल्यानंतर वेलावरील सर्व घोस काढावेत. काढलेल्या घोसातील मिरीचे दाणे अलग करावेत.
दाणे उकळत्या पाण्याची प्रक्रिया करून वाळवावेत. सुमारे ७ ते १० दिवस दाणे वाळवावे लागतात. काळी मिरी तयार करण्यासाठी काळी मिरी दाणे वाळण्यापूर्वी उकळत्या पाण्यात एक मिनीट बुडवून काढतात.
मिरीचे दाणे दोन ते तीन दिवसात वाळतात.
दाण्यांना आकर्षक काळा रंग येतो.
बुरशीमुळे साठवण करताना दाण्याचे नुकसान होत नाही.
मिरी दाण्याची प्रत सुधारते.
१०० किलो हिरव्या मिरीपासून सुमारे ३३ किलो काळी मिरी मिळते.
पांढरी मिरी निर्मिती
मिरीपासून पांढरी मिरीदेखील तयार करतात. युरोपियन देशात या मिरीला मागणी आहे. केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेने पांढरी मिरी तयार करण्याची पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीत पूर्ण पक्व झालेले दाणे उकळत्या पाण्यात २५ ते ३० मिनिटे उकळवतात. नंतर पल्पिंग यंत्रामध्ये हे दाणे टाकून त्यावरील साल काढली जाते.
साल काढल्यानंतर दाणे ब्लिचिंग पावडरच्या द्रावणात घालतात. त्यानंतर वाळवतात. या पद्धतीत दाण्याची साल फुकट जात नाही.
सालीपासून तेल काढता येते. पांढऱ्या मिरीचा उतारा सुमारे २५ टक्के इतका येतो.
- डॉ. वैभव शिंदे, ९५१८९४३३६३ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि. रत्नागिरी)
No comments:
Post a Comment