नाशिक : ग्रेडींग, क्लिनींग, वॉशिंग, पॅकींग, वाहतूक आणि मार्केटींगसाठी कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ लागेल. त्यादृष्टीने गावाकडे परतलेल्यांनी स्वीच ओव्हर व्हावे लागेल.
तज्ञांचा `सकाळ`शी संवाद
शेती-प्रक्रिया आणि ग्रामविकास यापुढे 1) व्हीजन आणि प्रामाणिक हेतूने उभे राहणाऱया नव्या पिढीतील नेतृत्व, 2) तंत्रज्ञान, 3) पायाभूत सुविधा, 4) ग्रामीण भागातील संपलेले भांडवल सुलभ रित्या पुन्हा भांडवल उभे राहण्यासाठी सरकारची धोरणे हे चार चॅलेंजस असतील. त्यासाठी व्यक्तीगत, उद्योग आणि सरकार अशा तीनस्तरावर काम होणे महत्वाचे असेल. ही भूमिका तज्ज्ञांनी मांडली आहे. शेतीचे उत्पन्न वाढत असताना मूल्यवर्धन करुन प्रक्रियायुक्त शेतमालाचे मार्केटिंग यामध्ये नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने सुंदर यशस्वी माॅडेल उभे केले. या कंपनीचे प्रमुख विलास शिंदे यांच्यासह पुण्याच्या कृषी आयुक्तालयात परदेशातील निर्यातीचे अभ्यासक गोविंद हांडे यांनी `सकाळ`शी संवाद साधला.
गोविंद हांडे
कोरोना नियंत्रणानंतर पुढील निर्णय
कोरोनाच्या उद्रेकानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी शहरांमध्ये राहणाऱया कष्टकऱयांनी आपल्या गावाकडे जाणे पसंत केले आहे. त्यातील बहुतांश जण गावाकडे कायमस्वरुपी राहण्याच्या मनस्थितीत पोचले आहेत. काही जण परिस्थिती पाहून पुन्हा शहराकडे रोजगारासाठी येऊ इच्छितात. शिवाय तिसरा भाग म्हणजे, कोरोना नियंत्रणानंतर पुढील निर्णय घेऊ इच्छितात. मुंबईहून गावाच्या ओढीने मुंबई-आग्रा महामार्गाने निघालेल्या कष्टकऱयांशी झालेल्या संवादातून या तीन बाबी पुढे आल्यात. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान अशा राज्यांमधील हे कष्टकरी होते. त्यामुळे स्वाभाविकपणे आता गावाकडची देशभरात स्थिती काय राहील, या अनुषंगाने तज्ज्ञांशी झालेले विचारमंथन विविध पुढे आलेत. ते असे...
मार्केटिंगचा आशावाद
कोरोनामधील आताची परिस्थिती प्रत्येकाने अनुभवली असल्याने सुटे, रस्त्यावरील, उघड्यावरील खरेदीचे प्रमाण कमी होईल आणि मध्यस्थतांची साखळी खंडीत होईल. त्यामुळे ऍग्रो प्रोसेसिंगमध्ये विपणन, पॅकींग, ग्रेडींग क्षेत्रात मनुष्यबळाचा उपयोग करुन घेता येईल. मात्र त्यासाठी ग्रामीण शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्राचे बळकटीकरण झाल्यास शेती आणि प्रक्रिया उद्योगातून ग्रामविकासाला चालना मिळेल हे मुख्य सूत्र पुढे आले. कोरोनाच्या दणक्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तेही वर्षभरानंतर शेती क्षेत्र रुळावर येण्यास सुरवात होईल, असा आशावाद तज्ज्ञांचा आहे.
विलास शिंदे
700 व्हॅल्यू चेन उलाढाल नेईल 10 लाख कोटीपर्यंत
उद्योगाला आवश्यक असलेले कौशल्याधिष्ठीत मनुष्यबळ तयार होत नाही. म्हणूनच उद्योगाच्या सहभागातून महाराष्ट्रात कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाची केंद्रे सुरु करावी लागतील. कृषी क्षेत्रात 700 व्हॅल्यू चेन उभ्या करण्यातून महाराष्ट्रातील कृषीशी निगडीत उलाढाल दहा लाख कोटींपर्यंत नेता येईल आणि 35 लाख रोजगार नवीन तयार होतील. सध्यस्थितीत महाराष्ट्राचे स्वतःचे उत्पन्न 28 लाख कोटी रुपयांचे असून त्यात साडेनऊ टक्के हिस्सा म्हणजेच, 2 लाख 40 हजार कोटी रुपये शेतीचा आहे. दुसरीकडे मात्र जगाच्या इकॉनॉमीमध्ये चीनचा 16 टक्के, तर शेती क्षेत्रात 18 टक्के हिस्सा आहे. ही परिस्थिती पाहता, वैयक्तीक उत्पादन घेऊन उपयोग होणार नाही, तर खाणाऱयापर्यंत जाण्याची व्यवस्था व्हॅल्यू चेनमधून तयार होईल.
फळे-भाजीपाल्यासाठी पाठबळ उभे करावे लागेल
फळे आणि भाजीपाल्याचे क्षेत्र 12 टक्के असून नाशवंत पिकाला पाठबळ मिळत नाही. प्रक्रियामध्ये हाय व्हॅल्यू क्रॉपमध्ये हाय रिस्क आणि अधिक नफा आहे. त्यामुळे त्यासाठी पाठबळ देणारी सरकारी व्यवस्था उभी करावी लागेल. ग्रामीण भागात कमी जागेत अधिक रोजगार तयार होतील अशी स्थिती आहे. पण सध्यस्थितीत एकरी 30 हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न तीन एकरापर्यंतच्या शेतकऱयांना मिळते. शेतकऱयांकडे पैसे आल्यावर गावातील शाळा आणि वैद्यकीय सुविधा बळकटीकरणाला चालना मिळणार आहे. त्यासाठी जागतिक बाजारपेठेचा विचार करुन आपणाला शेतीत उत्पादन घ्यावे लागेल.
काॅर्पोरेट कंपन्यांचे मार्केटिंग 0.7 टक्के
मार्केटिंगमध्ये मोठी संधी उपलब्ध आहे. मुंबईला दररोज दहा हजार टन फळे-भाजीपाला लागतो. त्याच्या एक टक्का मार्केटिंग लॉक डाऊनमध्ये शेतकऱयांनी केले. त्यावरुन मार्केटिंगमध्ये झेप घेण्याची किती मोठी संधी उपलब्ध आहे हे दिसून येते. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लॉक डाऊनमध्ये 70 हजार घरापर्यंत पोचली. मुळातच, देशामध्ये साडेआठ लाख कोटी रुपयांचे उत्पादन फळे आणि भाजीपाल्याचे होते. त्यातील केवळ 0.7 टक्के मार्केटिंग कॉर्पोरेट कंपन्या करताहेत. त्यात रिलायन्स, डीमार्ट, बिगबझार, अॅमेझाॅन, फ्लीपकार्ड, बिगबास्केट आदींचा समावेश आहे.
रेशीमप्रमाणे द्राक्षांमध्ये मोठी संधी
रेशीम उद्योगाची जगातील उलाढाल वर्षाला 125 लाख कोटी रुपयांची आहे. भारताची गरज 38 हजार टनाची गरज असताना प्रत्यक्षात देशात रेशीमचे उत्पादन 32 हजार टन होते. महाराष्ट्रात 3 हजार 200 टन उत्पादन होते. सध्यस्थितीत रेशीम कोशची निर्मिती महाराष्ट्रात होते. धागा कर्नाटकमध्ये तयार होतो आणि धाग्यापासून पैठणी येवल्यात तयार होते. त्यापेक्षा कोशासोबत धागा महाराष्ट्रात तयार होण्यातून मूल्यवर्धन करणे सहजशक्य आहे. पूर्वी फ्रान्स आणि जपानमध्ये रेशीम उद्योग मोठ्याप्रमाणात व्हायचा. या देशातील या उत्पादनाचे स्थान सेवा क्षेत्राने चीनचा हिस्सा 85 टक्क्यांपर्यंत पोचले असून भारत चीनकडून रेशीम आयात करते. त्याचबरोबर युरोपमध्ये 17 लाख टन द्राक्षे खालल्ली जातात. भारतातून एक लाख द्राक्षांची निर्यात होते.
शेतकरी कुटुंबाला वार्षिक ६ लाखांचे उत्पन्न शक्य
ग्रामविकासात योगदान देणारी शेती-प्रक्रिया उद्योग यासंबंधीची जागृती, प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, मार्केटिंग यावर काम करत असतानाच मॉडेल उभे करणे आणि त्यात सहभागीदारांची संख्या वाढवणे यादृष्टीने प्रयत्नांची दिशा अपेक्षित आहे. सध्यस्थितीत छोट्या व्यवस्थेला महत्व राहणार नाही. त्यासाठी ब्रॅंड तयार करण्याची दिशा स्विकारावी लागेल. शेतकऱयांच्या मालकीच्या कंपन्या उभ्या कराव्या लागणार आहेत. त्यातून शेतकरी कुटुंबाला वर्षाला सहा लाखांचे उत्पन्न मिळणे सहजशक्य होणार आहे. न्युझीलंड या 70 लाख लोकसंख्येच्या देशातून को-ऑपरेटिव्ह कंपनीतर्फे 12 हजार कोटींची किवीची उलाढाल होते.
महत्वाचे मुद्दे ः
0 देशातील एकुण फळांच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा 65 टक्के हिस्सा
0 देशातील एकुण भाजीपाल्याच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा 55 टक्के हिस्सा
0 महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाल्याची निर्यात ः 10 हजार कोटी रुपये
0 प्राथमिक आणि द्वितीय स्तरीय प्रक्रिया छोट्या उद्योगातून होते
0 अंतीम प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्या ः 25
0 वर्धा, नागपूर, सातारा, औरंगाबादमध्ये फूड पार्क. उद्योगांनी पायाभूत सुविधा, साठवणूक यावर भर देत प्रक्रियेला सुरवात केली
0 कोरोनामुळे मार्केटींगची चेन व्यापाऱ्यांच्या हातातून निसटली आहे. त्याची थेट संधी शेतकऱ्यांनी साधली. थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल शेतकऱ्यांनी पोचवला
0 कोरोनानंतर किमान पन्नास टक्के मार्केटींग चेन काबीज करण्याची संधी शेतकऱ्यांच्या शिक्षित तरुणांपुढे आहे
0 ई-मार्केटींग, ई-ट्रेडींगचा अवलंब करत आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून डोमॅस्टीक व इतर राज्यातील, परदेशातील मार्केटींग करणे शक्य
No comments:
Post a Comment