अजिसपूर ( ता. जि. बुलडाणा) या सुमारे तेराशे लोकवस्तीच्या गावाने शाश्वत स्वच्छतेकडून शाश्वत विकासाकडे वाटचाल केली आहे. सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी गावात स्वच्छतेची ज्योत पेटली. त्यानंतर विविध कामांच्या यशस्वी अंमलबजावणीतून व ग्रामस्थांच्या एकजुटीतून ही ज्योत अखंड तेवत आहे.
बुलडाणा जिल्हा मुख्यालयापासून आठ ते दहा किलोमीटरवर अजिसपूर गाव लागते. गावात सुमारे अडीचशे कुटुंब वास्तव्यास आहेत. उपजीविकेचे मुख्य साधन शेतीच. सिंचनाच्या सोयी असल्याने गावातून भाजीपाला उत्पादन वर्षभर घेतले जाते. सन २००६-०७ मध्ये जिल्हा परिषदेच्या संपूर्ण स्वच्छता अभियान कक्षामार्फत गावात महास्वच्छता अभियान राबविण्यास सुरवात झाली. तत्कालीन सरपंच महोदयांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेत गावाचा कायापालट करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांत जागृती करण्यात आली. कामांच्या आखणीनुसार अंमलबजावणी सुरू झाली.
शंभर टक्के करवसुली
ग्रामपंचायतीने आर्थिक बाबतीत स्वयंशिस्त पाळली आहे. पाणीपुरवठा योजनेचा कर दरवर्षी वसूल केला जातो. सर्व कुटुंबांकडे नळजोडणी करण्यात आली आहे. गावात कुठेली नळाच्या जलवाहिनीला गळती नाही. सुमारे २३१ नळ जोडण्या असून ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरविले जाते. प्रत्येक नळजोडणीवर मीटर बसविण्यात आले आहे. पाण्याचा स्त्रोत असलेला भाग स्वच्छ ठेवण्यात येतो. पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीला पाठविण्यात येतात. गेल्या काही वर्षांत पाण्याचे नमुने शुद्ध आल्याचे प्रमाणपत्र आरोग्य विभागातून घेण्यात आले आहे.
डिजिटल शाळा
पहिली ते सातवीपर्यंत मराठी पूर्व माध्यमिक शाळा असून स्वच्छतेच्या चळवळीत शाळेचा पुढाकार आहे. शाळेतील शिक्षकांनी स्वच्छता दूत या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या. गावची शाळा ‘डिजिटल’ म्हणून नावारूपाला आली आहे. शाळा-अंगणवाडीत ई- लर्निंग पद्धती, टीव्ही संच यांचा वापर होतो. लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट करण्यात आला. शाळेला प्रोजेक्टर, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगले डेस्क देण्यात आले आहेत. यामुळे शैक्षणिक वातावरण चांगले होण्यास मदत झाली.
सांडपाणी व कचऱ्याचे व्यवस्थापन
सांडपाण्याची तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. यासाठी शोषखड्ड्यांचा वापर केला जातो. सांडपाणी बंदिस्त पद्धतीने गावाबाहेर काढण्यात आले आहे. नाल्या बंदिस्त असल्याने डास निर्मितीला पायबंद घालता आला. गावाबाहेर तळे बनवून त्यात सांडपाणी एकत्र केले जाते. गावातील शंभर टक्के कुटुंबांकडे तसेच शासकीय कार्यालये, निमशासकीय इमारती, सहकारी संस्थांकडे तसेच सार्वजनिक शौचालय देखील बांधण्यात आले आहे. कचरा नियमित उचलला जातो. तो वाहून नेण्यासाठी सातत्यपूर्ण स्वतंत्र व्यवस्था आहे. प्रत्येक घरटी ओला व सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र भांडी आहेत. ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर केले जाते. या खताचा लिलाव करून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर घालण्यात येते.
आदर्शवत उपक्रम
गावाने ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव मोहिमेत सक्रिय भाग घेतला. विविध कामांची दखल घेऊन गावाला राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मलग्राम तसेच अन्य पुरस्कार मिळाले. स्वच्छतेची ज्योत गेल्या १० ते १२ वर्षांपासून विद्यमान सरपंच, गावकरी यांच्या सहकार्याने उजळते आहे. प्रत्येक घरावर कुटुंब प्रमुख स्त्री-पुरुषांच्या नावाचा फलक आहे. शाळा, चौकातील भिंतीवर विविध प्रकारच्या म्हणी लिहिल्या आहेत. त्यामुळे भिंती बोलक्या बनल्या. गावात गुटखाबंदी राबवली जाते. महिलांसाठी घरगुती उद्योगांची प्रशिक्षणे घेतली जातात. ग्रामपंचायतीकडे इंटरनेट, वायफाय आदी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. करभरणा तसेच अन्य आर्थिक व्यवहारासाठी ग्रामपंचायतीने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली. गावातील सर्व कुटुंबांकडे बॅंक खाती आहेत.
लोकसहभागातून शेतरस्ता
अजिसपूरच्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून साखळी शीवचा तसेच यावर्षी येळगाव धरणाकडे जाणारा शेतरस्ता तयार केला. त्यासाठी लाखांहून अधिक वर्गणी काढण्यात आली. यंत्रणांचे सहकार्य लाभले. रस्त्यांची सोय झाल्याने आता पावसाळ्यातही शेतमाल वाहतुकीची अडचण येत नाही. वनराई बंधारेही बांधले. गावात प्रवेश करताना दोन्ही बाजूंनी हिरवी झाडे स्वागताला उभी दिसतात.गावकऱ्यांनी त्यांचे संगोपन करण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे.
आयएसओ ग्रामपंचायत
शासकीय कार्यालयांविषयी अनेक वेळा नकारात्मकता दिसून येते. अजिसपूर या छोट्या ग्रामपंचायतीने मात्र वेगळेपण जोपासले. दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने आयएसओ ९००१-२०१५ नामांकन प्राप्त करीत जिल्ह्यात बाजी मारली. ग्रामपंचायतीची इमारत सुंदर आहे. स्वच्छता, नीटनेटकेपणा येथे दिसून येतो. सरपंच, उपसरपंच, सदस्यांना बैठकीसाठी खोल्या, फर्निचर, आलेल्यांना स्वच्छ पाणी, प्रत्येकाला गावाचा ताळेबंद कळेल असे फलक अशा सुविधा येथे आहेत.
बायोगॅसचा वापर
घरोघरी जनावरांचे संगोपन होते. मिळणाऱ्या शेणाचा वापर बायोगॅस बनविण्यासाठी होतो. त्यामुळे सिलिंडरवरील खर्च वाचला आहे. अनेक घरांमध्ये सौरऊर्जेवर चालणारी संयंत्रे आहेत. सौर वॉटर हीटर, गावातील पथदिवे या ऊर्जेवरच चालतात.
मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात आमच्या गावाने अनेक वर्षांपासून स्वच्छतेची कास धरली आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रेरणेतून राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमच्यात जिद्द निर्माण झाली. सर्वांच्या सहकार्याने अजिसपूर गाव राज्याच्या नकाशावर आणण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- बाळाभाऊ जगताप, सरपंच
गावाने स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान, निर्मल ग्राम अशा विविध क्षेत्रांत बाजी मारली. तत्कालीन ग्रामसेविका ममता पाटील यांचे यामागे मोठे प्रयत्न होते. गावकऱ्यांच्या सहकार्यातून हे काम पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. शाश्वत स्वच्छता व शाश्वत विकास यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.
- व्ही. आर. पंडित, ग्रामसेवक, अजिसपूर
गावाच्या विकासासाठी (कै.) शांताराम जगताप यांनी मोठे स्वप्न पाहले होते. त्यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियानसह अन्य सर्व अभियानात गावकऱ्यांनी सातत्य ठेवले. ते यापुढेही टिकवून ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- शेषराव जगताप, माजी सरपंच
लोकसहभाग आणि सर्वांच्या सहकार्यातून स्वच्छतेचा व विकासाचा रथ पुढे नेत आहोत. याला प्रशासनाचीही चांगली मदत मिळत आहे.
- सुभाष जगताप, सामाजिक कार्यकर्ते, अजिसपूर
आमचे गाव धार्मिक अधिष्ठान असलेले आहे. गावाची सामाजिक एकता अखंड टिकून आहे. नवीन पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी तसेच गावाच्या एकात्मतेसाठी सगळे हातभार लावतो.
- जगदेव तुकाराम पवार (महाराज), अजिसपूर
- व्ही. आर. पंडित, ७५८८०४१२१५ ग्रामसेवक, अजिसपूर, जि. बुलडाणा

0 comments:
Post a Comment