Showing posts with label Agriculture Guru. Show all posts
Showing posts with label Agriculture Guru. Show all posts

Saturday, July 7, 2018

मल्चिंग भात शेती तंत्रज्ञान

शेतामध्ये करण्यात येणारे यशस्वी प्रयोगच कालांतराने “आधुनिक तंत्रज्ञान” म्हणून ओळखले जाते. मल्चिंग पेपरच्या वापराने करण्यात येणारी भात  शेती हि शेतकरी बांधवांसाठी खूप फायद्याची ठरू शकते. मल्चिंग भात शेती तंत्रज्ञानामुळे लागणारा वेळ, मजुरांची अनुपलब्धता आणि दिवसागणिक वाढत जाणारा खर्च यांसारख्या समस्यांवर निश्चित तोडगा निघू शकतो. या तंत्रज्ञानाच्या अवलंबाने केवळ खर्चात कपात होत नाही तर कमी वेळात दर्जेदार उत्पादन आल्याने चांगला नफा मिळतो.
मल्चिंग भात शेती तंत्रज्ञान
  • नांगरणी आणि कुळवणी केल्यानंतर गादीवाफे तयार करावेत.
  • ४.५ फुटांवर सरी खणून घ्याव्यात.
  • गादीवाफ्यांची रुंदी ३ फुटांपर्यंत ठेवावी.
  • दोन गादीवाफ्यांमधील अंतर १.५ फूट ठेवावे.
  • यानंतर गादीवाफ्यांवर मल्चिंग पेपर अंथरावा.
  • पाऊस झाल्यानंतर मल्चिंग पेपर वर १ X १ फुटावर साधारण २ इंचाची छिद्र पाडावीत.
  • मातीमध्ये अपेक्षित ओलावा निर्माण झाल्यानंतर प्रत्येक छिद्रात ४–५ बियाणे टाकावीत.
  • बियाण्याची लागवड केल्यानंतर १५ दिवसात युरियाचा हफ्ता द्यावा.
  • दोन गादीवाफ्यांच्या मध्ये छोटी छिद्रे करून युरिया ब्रिकेट्स टाकावे.
  • एक एकरसाठी साधारण ६५ किलो युरिया लागू शकतो.
  • “कर्जत – ३” हि भाताची जात साधारणपणे ११०–१२० दिवसात तयार होते.

श्रावण घेवडा लागवड – 2

कमी दिवसात चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घेवडा या पिकाच्या लागवडीसंदर्भात काही महत्वपूर्ण पैलूंचा आढावा आपण “श्रावण घेवडा लागवड” या लेखाच्या पहिल्या भागात जाणून घेतली. लेखाच्या दुसऱ्या भागात आपण पूर्वमशागत, खते आणि पाणी व्यवस्थापन तसेच कीड व रोग नियंत्रण यासारख्या विविध पैलूंचा आढावा घेऊया.
पूर्वमशागत :
जमीनीची उभी आडवी नांगरट करून, कुळवाच्‍या पाळया देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत 40 ते 45 बैलगाडया हेक्‍टरी या प्रमाणात शेणखत मिसळावे.

लागवड :

खरीप हंगामात पिकाची पेरणी पाभरीने अथवा तिफणीने पहिला पाऊस पडून गेल्‍यावर, जमिन वाफश्‍यावर आल्‍यावर करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 45 सेमी आणि दोन झाडातील अंतर 30 सेमी ठेवावे. यानंतर विरळणी करून दोन झाडात 30 सेमी अंतर ठेवावे.बिया टोकन पध्‍दतीने 2 ते 3 सेमी खोलीवर पेराव्‍यात. उन्‍हाळी हंगामात बियांची पेरणी 60 ते 70 सेमी अंतरावर सरी वरंब्‍यावर करावी. वरंब्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला बगलेत 30 सेंटीमीटर अंतरावर 2 ते 3 बिया टोकाव्‍यात.

खते व पाणी व्‍यवस्‍थापन :

  • सर्वसाधारणपणे हेक्‍टरी 720 किलो बियाण्‍याचे आणि 630 किलो पाल्‍याचे उत्‍पादन देणा-या घेवडयाचे पीक जमिनीतून 66 किलो नत्र 27 किलो स्‍फूरद आणि 55 किलो पालाश शोषून घेते. यावरून घेवडयाच्‍या पिकाला जमिनीतून लागणा-या मुख्‍य अन्‍नघटकाची आवश्‍यकता लक्षात येते. निरनिराळया प्रयोगावरून घेवडयाच्‍या पिकाला शेणखत आणि रासायनिक खतांच्‍या पुढील मात्रांची शिफारस करण्‍यात आली आहे.
  • घेवडयाच्‍या पिकाला 40 टन शेणखत, 50 ते 54 किलो नत्र 50 ते 100 किलो स्‍फुरद आणि 50 ते 110 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे.
  • स्‍फूद आणि पालाश पूर्ण आणि अर्धा नत्र पेरणीच्‍या वेळी द्यावा आणि उरलेला अर्धा नत्र बी उगवल्‍यानंतर तीन ते चार आठवडयांनी द्यावा.
  • घेवडयाच्‍या पिकाची मुळे जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे पिकाला जास्‍त पाणी दिल्‍यास ते मुळांना अपायकारक ठरते. मात्र फूलो-याच्‍या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्‍यास फळधारणा कमी प्रमाणात होते.
  • म्‍हणून घेवडयाच्‍या पिकाला फूले येण्‍याआधी पाणी द्यावे. तसेच पावसाळयात जमिनितील पाण्‍याचा निचरा होणे आवश्‍यक असते. खरीप हंगामातील घेवडयाच्‍या पिकाला पाणी देण्‍यात आवश्‍यकता भासत नाही.
  • परंतू पाऊस नसल्‍यास पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. उन्‍हाळी हंगामातील पिकाला 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने आणि जमिनीच्‍या मगदुरानुसार पाण्‍याच्‍या पाळया द्याव्‍यात.

आंतरमशागत :

  • खरीप हंगामात पिकाची पेरणी केल्‍यानंतर 15 दिवसांनी विरळणी करावी. खरीप हंगामात तणांचा योग्‍य वेळी बंदोबस्‍त करणे आवश्‍यक आहे.
  • 1 ते 2 खुरपण्‍या देऊन तण काढावे किंवा पेरणीपूर्वी तणनाशकाची फवारणी करावी. खरीप हंगामात जास्‍त प्रमाणात पाऊस झाल्‍यास आणि योग्‍य प्रमाणात पाण्‍याचा निचरा न झाल्‍यास चर खोदून पाणी शेताबाहेर काढून द्यावे.

रोग व किड :

किड

मावा: मावा कीड घेवडयाच्‍या पानातील रस शोषून घेते. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वळतात. मावा किड वाढणा-या फांद्या आणि लहान पानांतील रस शोषून घेते. या किडीच्‍या प्रादुर्भावामुळे काहीवेळा फूलांची गळ होते.
उपाय : मावा किडीच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात सायपरमेथीन (25 टक्‍के प्रवाही) 5 मिली किंवा 10 मिलीलीटर रोगोर (30 टक्‍के प्रवाही ) या प्रमाणात पाण्‍यात मिसळून फवारावे.
शेंगा पोखरणारी अळी : ही किड प्रथम शेंगाच्‍या पृष्‍टभागावर आढळून येते. ही किड नंतर शेंगेच्‍या आत शिरून आतील दाणे खाऊन फस्‍त करते.
उपाय : या किडीचा उपद्रव दिसून येताच 5 टक्‍के कार्बरिल दर हेक्‍टरी 20 किलो या प्रमाणात धुराळावे.
खोडमाशी : लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांत या किडीचा मोठया प्रमाणावर उपद्रव होतो. या किडीचे मादी फूलपाखरू पीक पहिल्‍या दोन पानांवर असतांना पानांवर अंडी घालते. अंडी उबवल्‍यानंतर अंडयामधून अळया बाहेर पडतात. अळी खोडावर जाते आणि खोडाच्‍या आतील भाग पोखरून खाते. या किडीचे सुप्‍तावस्‍थेत कोश जमिनीलगत खोडामधून पडतात.
उपाय : खोडमाशीच्‍या अळीच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 5 मिलीलिटर सायपरमेथीन (25 टक्‍के प्रवाही) हे कीटरनाशक मिसळून फवारणी करावी.

रोग

भूरी : हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगाची पिकाला लागण झाल्‍यास पानावर, काडयावर आणि शेंगावर पांढरी पावडर असलेले ठिपके दिसतात.
उपाय : घेवडयावरील भूरी रोगाच्‍या नियंत्रणासाठी 300 मेश गंधकाची भुकटी दर हेक्‍टरी 30 किलो प्रमाणात धुराळावी.
तांबेरा : तांबेरा हा बुरशीजन्‍य रोग असून त्‍यात पानाच्‍या खालच्‍या भागावर तांबूस काळपट रंगाचे फोड येतात.
उपाय : तांबेरा रोगाच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 20 ग्रॅम डायथेन एम-45 हेक्‍टरी बुरशीनाशक मिसळून तांबेरा रोगाची लागण दिसून येताच फवारणी करावी.
मर : मर (विल्‍ट) हा बुरशीजन्‍य रोग असून या रोगाची पिकाला लागण झाल्‍यास झाडांची पाने पिवळी पडून ती गळतात.
उपाय : मर रोगाच्‍या नियंत्रणासाठी बियाण्‍यास पेरणीपूर्वी बुरशीनाशक औषध चोळावे किंवा घेवडयाच्‍या रोगप्रतिबंधक जाती लावाव्‍यात.

उत्‍पादन :

श्रावण घेवडयाचे हेक्‍टरी उत्‍पादन 27 क्विंटलपर्यंत घेता येते.

श्रावण घेवडा लागवड - 1

भारतात घेवड्याची लागवड सर्वत्र केली जाते. महाराष्‍ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इत्‍यादी जिल्‍हयांमध्‍ये श्रावण घेवडयाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्‍पन्‍न देणारे पिक आहे. घेवडयाच्‍या कोवळया शेंगाची भाजी तसेच सुकलेल्‍या दाण्‍यांची उसळ लोकप्रिय आहे. घेवडयांच्‍या पानाचा उपयोग जनावरांच्‍या चा-यासाठी करता येतो. शेंगामध्‍ये अ आणि ब जीवनसत्‍व तसेच खनिजे, लोह आणि चुना तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
जमिन व हवामान:
  • घेवडा हेक्‍टरी पिक हलक्‍या ते मध्‍यम जमिनीत पाण्‍याचा निचरा असणा-या जमिनीत उत्‍तम प्रकारे येते.
  • अतिभारी जमिनीत झाडांची वाढ भरपूर होते. परंतु शेंगा कमी लागतात.
  • जमिनीचा सामु 5.5 ते 6 च्‍या दरम्‍यान असावा.
  • घेवडा हेक्‍टरी थंड हवामानात आणि पावसाळयात येणारे पिक असून 15 ते 40 अंश सेल्सिअस तापमानात हेक्‍टरी पिक चांगले येते.
  • अतिथंडी व अतिउष्‍ण हवामान या पिकास मानवत नाही.

पूर्व मशागत:

  • जमिनीची उभी आडवी नांगरट करून, कुळवाच्‍या पाळया देऊन ढेकळे फोडून जमिन भूसभुशीत करावी.
  • जमिनीत 40 ते 45 बैलगाडया हेक्‍टरी या प्रमाणात शेणखत मिसळावे.

लागवड हंगाम:

  • महाराष्‍ट्रात या पिकाची लागवड तीनही हंगामात होते.
  • खरीप हंगामासाठी जून, जूलै महिन्‍यात रब्‍बी हंगामासाठी सप्‍टेबर ऑक्‍टोबर महिन्‍यात आणि उन्‍हाळी
  • हंगामात जानेवारी, फेब्रूवारी महिन्‍यात घेवडयाची लागवड करतात.

वाण:

  • घेवडयाच्‍या कटेंडर, पुसा पार्वती, अर्का कोमल, व्‍ही.एल., 5 जंपा, पंत अनुपमा, फूले सुयश या प्रकारच्‍या जाती लागवडीयोग्‍य आहेत.

बियाण्‍याचे प्रमाण:

  • प्रति हेक्‍टरी 40 किलो बियाणे लागते.
  • टोकन पध्‍दतीने लागवड केल्‍यास हेक्‍टरी 25 ते 30 किलो बी लागते.

श्रावण घेवडा लागवड भाग - 2 साठी येथे क्लीक करा.

बीज परीक्षण

मॉन्सून आता कोणत्याही क्षणी बरसेल. शेतकरी बांधवांची कमला सुरुवात झाली आहे. नियोजनाअंतर्गत शेतकरी बांधवांनी पिकाची निवड केल्यानंतर पेरणीपूर्वी बीज परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. कारण बियाणांची उगवण क्षमता जर उत्तम असेल त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्नावर होणार आहे. बियाणांची उगवण क्षमता कशी तपासून घ्यावी या बाबत सविस्तर जाणून घेऊया.
बियाणांची उगवणक्षमता तपासून घेणे का गरजेचे आहे?
उत्पन्न भरघोस येण्यासाठी केवळ हवामानावरच अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. पेराल तसं  उगवेल या म्हणी प्रमाणे बियाणे उत्तम व दर्जेदार असेल तर उत्पादित पिकाचा दर्जा हि उत्तमच असेल. व त्यामुळे अशा उत्पादनास बाजारभावही उत्तम मिळेल यात शंकाच नाही. म्हणूनच आपण पिक घेण्यापूर्वी बियाणांची उगवणक्षमता तपासून घेणे गरजेचे आहे.

बियाणांची उगवणक्षमता कशाप्रकारे तपासावी?

  • खरेदी केलेल्या बियाण्यांपैकी काही भाग म्हणजे साधारण ४०० ते ५०० बी नमुना म्हणून घेऊ शकतो.
  • निश्चित केलेले बी कोणत्याही प्रक्रियेतून गेलेली नसावी  तसेच ती शुद्ध बियाण्यांच्या समूहाचा भाग असावी.
  • संबंधित बियाण्यांचा नमुना प्रयोगशाळेत गेल्यानंतर उगवण  कक्ष अर्थांत जर्मिनेटर या उपकरणाच्या मदतीने बियाणाची उगवणक्षमता तपासली जाऊ शकते.
  • बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद वापरला जातो. ज्याला टॉवेल पेपर म्हटले जाते. या टॉवेल पेपरमध्ये असलेल्या ओलाव्यामुळे बियाणाची उगवण आणि वाढ होण्यास मदत होते.

उगवण क्षमता किती पद्धतीने तपासता येऊ शकते?

१. शोषकागादाच्या मदतीने उगवणक्षमता तपासणी :-
या पद्धती अंतर्गत लहान आकाराच्या बियाणांची उगवणक्षमता तपासली जाते. यामध्ये काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळ थर ठेवून त्यावर शोषकागद ठेवून तो पाण्याच्या मदतीने ओला करावा. जास्त पाणी झाल्यास निथळून घ्यावे. यामध्ये बी ठेवून ही प्लेट उगवण कक्ष म्हणजेच जर्मिनेटर मध्ये ठेवावी. जर कक्षामध्ये आर्द्रता उच्चदर्जाची असेल तर उगवण होण्यास मदत होऊ शकते.
२. टॉवेल पेपरच्या मदतीने उगवणक्षमता  तपासणी :-
उगवणक्षमता चाचणीसाठी वापरण्यात येणारा विशेष कागद म्हणजेच दोन टॉवेल  पेपर घ्यावेत. या कागदामध्ये बी मोजून ठेवावेत आणि कागदाची गोल गुंडाळी करून घ्यावी. मेणकागदामध्ये ३/४ भाग गुंडाळून आवश्यक असणाऱ्या तपामान आणि आर्द्रता असलेल्या जर्मिनेटर मध्ये ठेवावेत.
३. वाळूमध्ये उगवणक्षमता तपासणी :-
आपल्याकडे असणाऱ्या कुंडी  आणि ट्रे मध्ये ओली वाळू घेऊन एक ते दोन से. मी. खोलीवर समान अंतरावर मोजून बी ठेवावी. अशा कुंड्या किंवा ट्रे जर्मिनेटर मध्ये ठेवल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसांमध्ये बियाणांची उगवण होऊ शकते .
राज्यसरकारतर्फे पुणे, परभणी आणि नागपूर येथे स्थापन करण्यात आलेल्या तीन केन्द्रांमध्ये आपण बियाणांची शुद्धता, कीटकांमुळे झालेला दुष्परिणाम, बियाणांची उगवणक्षमता तसच बियाणांच्या वंशिकतेबाबत  माहिती मिळू शकते. आपण या तीन केंद्रांमध्ये बियाण्यांचा नमुना सादर केल्यानंतर आपल्याला तीस दिवसांच्या  आत परिक्षणाचा  अहवाल मिळू शकतो आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे ही तपासणी आपण माफक दरात करू शकतो. यंदा पेरणीआधी बियाणांचं परिक्षण  करायला विसरू नका.

खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – २

खरीप हंगामात विविध कडधान्याची लागवड केली जाते. यासाठी व्यवस्थापन कसे करावे याचा आढावा घेताना खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन या लेखाच्या पहिल्या भागात आपण जमीन- हवामान, पूर्वमशागत, खत व्यवस्थापन, आंतरपीक अशा विविध पैलूंचा आढावा घेतला. या भागात आपण पाणी व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि रोग नियंत्रण यासारख्या विविध पैलूंबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पाणी व्यवस्थापन –
खरीप कडधान्य पिके बहुतांशी पावसाच्या पाण्यावर येते. परंतु पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्यास आणि जमीन मध्यम उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहत नाही. जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास पिकाची मोठ्या प्रमाणावर फुलगळ होते. हे टाळण्यासाठी जमिनीतील ओलावा फार कमी होण्यापूर्वीच आणि फुले येण्याच्या सुरवातीलाच संरक्षित पाणी द्यावे.
अवर्षणप्रवण भागात लवकर येणाऱ्या तुरीच्या पिकास पावसाची शक्यता नसेल आणि पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर पहिले पाणी फुलकळी लागताना, दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना आणि तिसरे शेंगात दाणे भरताना द्यावे. मात्र पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

एकात्मिक कीडनियंत्रण –

तूर पिकाचे खरे आर्थिक नुकसान शेंगांतील कोवळ्या दाण्यावर उपजीविका करणाऱ्या घाटे अळी, पिसारी पतंगाची अळी शेंगेवरील काळी माशी या प्रमुख किडींपासून होते. या किडीचे वेळीच नियंत्रण केले नाही तर उत्पन्नात 30 ते 40 टक्के घट येते. त्यासाठी तूर पिकाची पेरणी वेळेवर करावी, पिकाची फेरपालट करावी, उन्हाळी नांगरट व पूर्वमशागत, पूर्वीच्या पिकाची धसकटे वेचून घ्यावीत, सुधारित वाणांची पेरणी करावी, पेरणीपूर्वी बियाण्यांस बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी, तसेच राझोबियम चोळावे. बाजरी/ ज्वारी/ भुईमूग/ सोयाबीन या पिकांबरोबर तूर हे आंतरिक घ्यावे, वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी. फेरोमोन ट्रॅप (गंध सापळे) पिकांमध्ये लावावेत. पक्ष्यांना बसण्यासाठी काठ्या/ मचाने लावावेत. गरजेनुसार खालील कीटकनाशकाची फवारणी करावी.
तूर पिकावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या स्वरूपात आढळून आल्यास आवश्यकतेनुसार इमामेक्टिन बेन्झोएट चार ग्रॅम अथवा स्पिनोसॅड चार मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. म्हणजेच या कीटकनाशकांचे प्रमाण 200 मि.लि. प्रति हेक्टर प्रमाणे येते. या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे प्रभावी कीडनियंत्रण होते.
मूग आणि उडीद या पिकांवर प्रामुख्याने भुरी आणि यलो मोझॅक (पिवळा विषाणू) या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
भुरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाच्या खालील पानांवर पांढरे ठिपके दिसतात व थोड्याच दिवसांत पानांच्या बऱ्याचशा भागावर अनियमित आकाराचे पिवळे चट्टे दिसू लागतात. भुरीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसून येताच पाण्यात मिसळणारे गंधक 1250 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 500 लिटर पाण्यातून फवारावे.
यलो मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा वाहक असलेल्या पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी 30 टक्के प्रवाही डायमेथोएट 500 मि.लि. 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारावे. आवश्यकता भासल्यास आठ-10 दिवसांनी आणखी एक फवारणी करावी.

तुरीवरील वांझ रोगाचे नियंत्रण –

ऊस पिकाच्या शेजारी तूर पेरणी केल्यास (म्हणजेच तूर पिकाच्या एका बाजूस अथवा दोन्ही बाजूंस लागून ऊस पीक असेल तर) हमखास तुरीवर वांझ रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ऊस पिकास बारमाही पाणी दिले जात असल्याने रोगासाठी अनुकूल वातावरण तयार होते. वांझ रोगास कारणीभूत असणारा माईट (वाहक कोळी) मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. तूर पिकाची लागवड ऊसाशेजारी टाळावी.
वांझ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोळी किडीच्या (माईट) नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसताच डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 10 मि.लि. किंवा डायकोफॉल (20 टक्के प्रवाही) 25 मि.लि. किंवा फिप्रोनील (25 टक्के प्रवाही) सहा मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 टक्के प्रवाही) चार मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाची तीव्रता जास्त असल्यास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – 1

हरभरा, तूर, मूग, उडीद ही प्रमुख कडधान्य पिके असून, मटकीचा समावेश दुय्यम कडधान्य पिकामध्ये केला जातो. मटकीला वर्षभर मागणी असून, कमी लागवड क्षेत्र व उत्पादकतेमुळे वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो.  राजस्थाननंतर लागवडीमध्ये महाराष्ट्राचा क्रम लागतो. या पिकाचा हिरवळीच्या खतासाठी व चारा पीक म्हणूनही लागवड करता येते. खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन  – १ या लेखात आपण या पिकांसाठी व्यवस्थापन कसे करावे याचा आढावा घेऊया.
जमीन व हवामान –
  • मध्यम ते भारी (45 ते 60 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकास योग्य असते.
  • चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन कडधान्य लागवडीसाठी वापरू नये.
  • तूर या पिकास 21 ते 25 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे हवामान या पिकास अधिक उपयुक्त असते.

पूर्वमशागत –

तूर पिकाची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे खोल नांगरणी करून वरवरच्या पाळ्यांनी जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीच्या अगोदर हेक्‍टरी पाट टन चांगले कुजलेले कंपोस्ट खत/ शेणखत जमिनीत चांगले मिसळावे.

बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन –

बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून चोळावे. यानंतर प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास चवळी गटाचे रायझोबियम जिवाणू संवर्धक तूर बियाण्यासाठी 250 ग्रॅम वजनाचे एका पाकिटातील संवर्धक गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.

खते –

पिकाच्या सुरवातीच्या काळात नत्राची गरज भागविण्यासाठी तूर पिकाची पेरणी करताना 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद म्हणजेच 125 किलो डायअमोनिअम फॉस्फेट (डीएपी) अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्‍टरी द्यावे. प्रति हेक्‍टर 30 किलो पालाश म्हणजेच 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिले असता पीक प्रतिसाद देऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते असा अनुभव आहे.

आंतरमशागत –

  • पीक सुरवातीपासूनच तणविरहित ठेवावे.
  • कोळप्याच्या साहाय्याने पीक 20-25 दिवसांचे असताना पहिली आणि 30-35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहून पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळींतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्‍यतो वाफशावर करावी.
  • मजुराअभावी खुरपणी करणे शक्‍य नसल्यास पेरणीपूर्वी तणनाशकाचा वापर करावा. त्यासाठी पेंडीमिथॅलीन हे तणनाशक हेक्‍टरी तीन लिटर 500 ते 700 लिटर पाण्यातून जमिनीवर फवारून वरवर पाळी घालावी. ते जमिनीत चांगले मिसळले जाऊन तणनियंत्रण अधिक प्रभावी होते.

आंतरपीक –

एक ओळ तुरीनंतर तीन ओळी सोयाबीन या पिकांच्या घेतल्या, तर तुरीचे सरासरी 1.5 टन हेक्‍टरी उत्पादन हाती येते. सोयाबीनचे दोन टनांपर्यंतचे उत्पादन मिळू शकते.
या लेखाच्या पुढील भागात आपण पाणी व्याव्स्थापन, रोग आणि कीड नियंत्रण यासारख्या पैलूंचा आढावा घेऊया.

शेततळे

शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत पिकास उपलब्ध होण्यासाठी किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी खोदलेले तळे म्हणजेच शेततळे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, मत्स्य उत्पादनासाठी, पिण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो.
शेततळे कसे बनवाल ?
  • शेतजमिनीतील मोक्याच्या जागेची निवड करून चारही बाजूने खणावे. शेततळे किमान १ ते १.५ मीटर खोल असावे.
  • या खड्ड्याच्या आतील बाजूने प्लास्टिक पेपर अंथरावा. (याला लायनिंग असे म्हणतात).
  • हा प्लास्टिक पेपर साधारण १०० मायक्रोन आणि ४०० ते १००० गेज चा असावा.
  • शेत तळ्याच्या बाजूच्या भिंतींचा कोन साधारण ४५ अंश च्या जवळ असणे महत्वाचे असते.

शेततळे बांधताना घ्यावयाची काळजी :

  • शेततळे तयार करताना ज्या जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण कमी आहे, अशा जागेची निवड करावी.
  • शेततळ्याचे आकारमान निश्चित करण्यासाठी प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा निश्चित करावी.
  • चाचणी खड्डे घेऊन शेततळ्याची खोली निश्चिेत करावी.
  • शेततळ्यात ज्या क्षेत्रातून पाणी येणार आहे, ते पाणलोट क्षेत्र निश्चित करून त्याचे क्षेत्र मोजावे.
  • शेतातील पाण्याचा प्रवाह निश्चित करावा.
  • शेततळ्याचे आकारमान ठरविताना पडणारा पाऊस व त्याची तीव्रता, पाणलोट क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळ्याकरिता उपलब्ध जागा, भिजवावयाचे क्षेत्र व त्यात घ्यावयाची पिके निश्चित करावी.
  • शेततळ्याचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्राच्या दोन ते अडीच टक्यांपेक्षा जास्त नसावे. साधारणतः दोन हेक्टर क्षेत्राकरिता 20 X 20 X 3 मी. (1200 घनमीटर) आकारमानाचे शेततळे खोदावे.
  • शेततळे बांधताना माती शेततळ्यात वाहून येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • ज्या ठिकाणी शेततळे बांधावयाचे आहे तो परीसर शक्यतो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असावा.
महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळे बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. या योजनेसाठी शेतकरी बांधव अर्ज भरू शकतात.

लाभार्थी पात्रता :

  • शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमीत कमी दीड एकर जमीन असावी. यात कमाल जमीन धारणेची मर्यादा नाही.
  • लाभार्थी शेतकऱ्याची जमीन तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. जेणेकरून पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये भरणे किंवा पुनर्भरण करणे शक्य होईल.
  • अर्जदाराने यापूर्वी शेततळे, सामुदायिक शेततळे किंवा भातखाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
अर्जदाराला खालील कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहे.
  • जातीचा दाखला
  • ७/१२ चा उतारा
  • ८ -अ नमुना (संबंधित शेतक-याचे ८ अ प्रमाणे एकूण क्षेत्र)
  • आत्महत्याग्रस्त्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला. (तलाठी)
  • दारिद्र्य रेषेबाबतचा दाखला (ग्राम सेवक)
  • स्वतःच्या स्वाक्षरीसह भरलेला अर्ज
  • आधार कार्ड (उपलब्ध असल्यास)

सेंद्रिय शेतीसाठीची मानके

सेंद्रिय शेतीचे फायदे या मागील लेखात आपण सेंद्रिय शेतीमुळे होणारे फायदे जाणून घेतले. या सदरात आपण सेंद्रिय शेती करण्यापूर्वीचे निकष, त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी, विविध योजना, सेंद्रिय शेती कार्यक्रम पद्धती याबरोबरच सेंद्रिय शेती प्रक्रियेतील आवश्यक गोष्टी  इ .सर्व गोष्टीची माहिती जाणून घेऊया.  त्यामध्ये मुख्यत सेंद्रिय शेती करण्याची गरज आपण मागील सदरात बघितले आता ह्या सदरात सेंद्रिय शेतीसाठीची मानके काय असतील?  ते बघूया.
उपलब्ध नैसर्गिक साधने आणि तंत्राचा अवलंब :
  • शक्यतो गावरान बियाण्याचा वापर करावा कारण ते रोग व कीड प्रतिकारक असते तसेच ते कोणत्याही वातावरणात उत्तम वाढते. जर आपल्याकडे असे बियाणे उपलब्ध नसेल तर आपण आपल्या शेतीत पूर्वी तयार केलेले बियाणे वापरावे.
  • पिकाची फेरपालट करून जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण वाढून कीड व रोगाचे नियत्रण होते .
  • शेतीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतीत उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ, हिरवळीची खते , गांडूळ खते , कंपोस्ट खत , खोल मुळे असणाऱ्या वनस्पती तसेच द्विदल पिकाची लागवड करणे जरुरी आहे.
  • पिक लागवडीच्या आधी नैसर्गिक पद्धतीचा वापर करावा. उदा. गोमुत्र, राख, जीवाणू खत ई .
  • पिक संरक्षणासाठी निंबोळी अर्क, सापळा पिके, मित्र पिके, लसुन मिरची ताक मिश्रण, परोपकारी जीवजंतू व कीटकांचा वापर करावा.

रासायनिक खतांचा वापर टाळा :

  • पिकाची वाढ होण्याकरिता रासायनिक संप्रेरकाचा वापर न करता शेती व परिसरातील वनस्पती, प्राणी, सूक्ष्म जीवजंतूपासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेली कीड व रोग नियंत्रक वापरावीत.
  • शेजारील शेतीतून रासायनिक खते येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • पाण्याचा स्रोत असणारे विहीर, नदी, नाला, ओढा, तलाव हे प्रदूषणमुक्त ठेवावे किवा त्यास प्रदूषणापासून संरक्षित करावे.

नैसर्गिक पद्धतीचा अवलंब आणि योग्य नियोजन :

  • पाळीव पक्षी, प्राणी यांना सेंद्रिय आहार द्यावा व त्याच्या आरोग्याचे नैसर्गिक पद्धतीने संरक्षण करावे.
  • साठवणुकीकरता पारंपारिक नैसर्गिक योजना म्हणजेच कडूनिंबाचा पाला , राख यांचा वापर करावा.
  • सेंद्रिय शेतकर्याने आपल्या दैनदिन नोंदवहीत सर्व कामाची नोंद करणे आवश्यक आहे.
  • सेंद्रिय शेती करताना रासायनिक पदार्थाचा वापर करू नये. सेंद्रिय शेती किवा शेतीमाल याचे प्रमाणीकरण करण्याकरिता शेती सलग तीन वर्षापासून रसायन मुक्त असावी.
  • शेवटी कस सेंद्रिय शेती करण्याचे ध्येय असावे अन्यथा पुन्हा जमिनीचे प्रदूषण, आरोग्याचे धोके वाढून हे दृष्टचक्र जास्तीच बलावणार आहे.

ड्रीप इरिगेशन

ड्रीप इरिगेशन किंवा ठिबक सिंचन पाणी कमतरतेवर एक प्रभावशाली उपाय म्हणून ओळखला जातो. दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे कृषी क्षेत्राला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांना पाण्याअभावी नुकसान सहन करावे लागते. याबरोबरच खतांच्या किंमतीमध्ये होणारी वाढ  देखील शेतकरी बांधवांच्या चिंतेचा विषय ठरली आहे. अशात ठिबक सिंचनाचा वापर केल्यास कमी पाण्यात शेती करणे शक्य होईल.
काय आहे ड्रीप इरिगेशन?
रोपांच्या मुळाशी योग्य नियोजनाअंतर्गत पाण्याचे थेंब ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देण्याचा विधी. याच्या अवलंबामुळे केवळ पाण्याची बचत होत नाही तर याबरोबरच खत व्यवस्थापन देखील उत्तमरीत्या करता येणे शक्य आहे. महत्वाचे म्हणजे विविध पिकांसाठी ड्रीप इरिगेशन किंवा ठिबक सिंचनाचा वापर करता येणे शक्य आहे.
ठिबक सिंचन संचाच्या मदतीने प्लॅस्टिक च्या पाईप्स (नळ्या) मधून ठराविक अंतराने योग्य प्रमाणात पाणी दिले जाते. महत्वाचे म्हणजे हे पाणी थेट रोपाच्या मुळाशी दिले जाते. सामान्य पद्धतीत रोपाला पाणी दिले असता रोपाच्या मुळाशी कमी पाणी जाते. बहुतांश पाणी जमिनीत जाते किंवा बाष्पीकरणात वाया जाते. यामुळेच पाण्याच्या बचतीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरू शकते. कारण यामुळे रोपाला पाणी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होते.

ठिबक सिंचनाची वैशिष्ट्ये –

  • रोपाच्या मुळाजवळ नेहमीच योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध राहते.
  • जमिनीत माती आणि पाण्याचा समतोल योग्य प्रमाणात राहिल्याने पिकाची वाढ वेगाने आणि समप्रमाणात होते.
  • पिकाला दरदिवशी किंवा एकदिवसाआड पाणी देणे शक्य होते.
  • पाणी कमी वेगात देणे शक्य होते.

ड्रीप इरिगेशनचे फायदे –

  • उत्पादनात १५० टक्क्यांपर्यंत वाढ शक्य आहे.
  • ७० टक्के पाण्याची बचत. यामुळे वाचलेल्या पाण्याचा इतर महत्वाच्या कामांसाठी वापर करता येऊ शकतो.
  • पिकाची वाढ नियमित वाढ होते आणि पीक लवकर पक्व होते.
  • पिकाची वाढ वेगाने झाल्यामुळे गुंतवणुकीवर जलद फायदा मिळणे शक्य होते.
  • फर्टिगेशन मुळे पोषक तत्व थेट रोपाच्या मुळांशी जातात यामुळे विद्राव्य खते कमी लागतात यामुळे खर्चात कपात होते.
  • विद्राव्य खतांची कार्यक्षमता ३० टक्क्यांनी वाढते.
  • खते, आंतरमशागत आणि मजुरांवरील खर्चात कपात होते.
  • ओसाड जमीन, खारी जमीन तसेच उंच सखल जमिनीचा वापर शेतीसाठी करणे शक्य आहे.
ड्रीप इरिगेशन e-book डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

शेतीच्या प्रगतीसाठी ह्युमिक अॅसिड

सेंद्रिय शेतीचे महत्त्व आता सर्वांनाच समजले आहे. परंतु हि शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने कशी करु शकतो हे शेतक-याने जाणुन घेणे खुप महत्वाचे आहे. सेंद्रिय शेती अधिक फायदेशिर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पहाणे गरजेचे आहे. यासर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी ह्युमस /ह्युमिक अॅसिड चा वापर करणे आवश्यक आहे. ह्युमिक अॅसिड चा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे.
ह्युमस / ह्युमिक अॅसिड ?
ह्युमस म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच  पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे.

ह्युमिक अॅसिड चे गुणधर्म –

  • ह्युमिक अॅसिड हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.
  • हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.
  • ह्युमिक अॅसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.
  • ह्युमिक अॅसिड हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते.

ह्युमिक अॅसिडचे फायदे –

  • ह्युमिक अॅसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.
  • मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिर
  • नत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते.
  • ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते.
  • ह्युमिक अॅसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.
  • ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.
  • जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.
  • याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.
  • बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.
  • ह्युमिक अॅसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.
  • सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.
  • युरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.
  • रासायनिक खतांची कार्यक्षमता ३०% पर्यंत वाढवते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.
  • हे पुर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे याच्या अतिवापरामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.

बाजारात उपलब्ध असलेले ह्युमिक अॅसिड

अनु क्र.ह्युमिक अॅसिडचे नाववितरकाचे नाव
1ह्युमिब्रुटस्वरुप अॅग्रो
वंडर 5स्वरुप अॅग्रो
मॅक्स गोल्डमॅक्झिम
मॅक्स केअस एस. जी.मॅक्झिम
ह्युमिगोल्डअंजली बायोटेक
रुटोअंजली बायोटेक
सिएकोमहिन्द्रा
जिंगोमहिन्द्रा
पॉवर प्लसआस्था
१०रुटामल्टिलाईन एग्रो

व्हर्टीकल फार्मिंग भविष्यासाठी आवश्यक

वाढत्या लोकसंख्येमुळे, शहरीकरणामुळे, ग्रामिण भागात जमिनीची मोठ्या प्रमाणात विभागणी झाल्यामुळे उत्पादकता कमी झाली आणि याचा अभाव शेतक-यांच्या उत्पादनावर होतोय. उपलब्ध जागेत तयार करायचा असल्यास व्हर्टीकल फार्मिंग हे वरदानच ठरेल.
व्हर्टीकल फार्मिंग म्हणजेच उभ्या मांडण्यांमध्ये किंवा शेल्फमध्ये विविधप्रकारचे ट्रे व कुंड्या वापरुन त्यात सुपिक माती अथवा इतर माध्यमे वापरुन(कोकोपिट, व्हर्मीक्लाइत, राईसब्रान, हायड्रोप्रनिक्स वगैरे) वापरुन त्यात सुर्यप्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश, वायु, पाणी, तापमान, आर्द्रता आणि विद्रव्य खते (आवश्यक अन्नद्रव्ये) यांचा नियंत्रित वापर करुन शेती केली जाते.
व्हर्टिकल फार्मिंगचे फायदे :
  • बदलणारे तापमान, अवकाळी पाऊस, गारपीट, गंभीर दुष्काळ ह्यासर्व समस्यांमध्ये हवामान नियंत्रित व्हर्टिकल फार्मिंग केल्यास लोकसंख्येच्या मागणी इतका पुरवठा आपण नक्कीच करु शकतो.
  • व्हर्टीकल फार्मिंगचा अजुन एक फायदा म्हणजे हे तंत्र अवलंबल्यास यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत होईल.
  • व्हर्टीकल फार्मिंग अधिक प्रभावी होण्यासाठी खालील गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.

हरितगृहाचा वापर :-

व्हर्टिकल फार्मिंग करताना हरितग्रहाचा वापर करणे शक्य आहे. कारण हरितगृहामध्ये एकदा कोणते पीक घ्यायचे आहे याची निश्चिती झाल्यावर स्टॅन्ड चा चपखल वापर करून उत्पादन घेणे शक्य आहे. हरितगृहाच्या वापरामुळे पिकानुसार सूर्यकिरणांची तीव्रता कमी करणे शक्य होते. त्याचप्रमाणे पिकासाठी आवश्यक तापमान आणि वायू निर्मिती यांच्या मदतीने कमी जागेत दर्जेदार पीक घेता येते.

उभ्यामांडणीसाठी स्टॅंड :-

पिकाची निवड केल्यानंतर उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. रोपं कशापद्धतीने लावायची हे निश्चित झाल्यानंतर स्टॅंड ची मांडणी कशी करता येईल याचा योग्य विचार करून आराखडा निश्चित करावा. असे करताना रोपांना वाढीसाठी कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक स्टँड मधील रोपाला योग्य पाणी. योग्य प्रकाश कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे.
व्हर्टीकल फार्मिंग म्हणजेच उभ्या मांडण्यांमध्ये किंवा शेल्फमध्ये विविधप्रकारचे ट्रे व कुंड्या वापरुन त्यात सुपिक माती अथवा इतर माध्यमे वापरुन(कोकोपिट, व्हर्मीक्लाइत, राईसब्रान, हायड्रोप्रनिक्स वगैरे) वापरुन त्यात सुर्यप्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश, वायु, पाणी, तापमान, आर्द्रता आणि विद्रव्य खते (आवश्यक अन्नद्रव्ये) यांचा नियंत्रित वापर करुन शेती केली जाते .

हायड्रोप्रोनिक्सचा वापर :-

व्हर्टिकल फार्मिंग अंतर्गत शेती करताना आधुनि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हायड्रोप्रोनिक्सचा वापर हा त्यातील एक महत्वाचा घटक म्हणता येईल. यामध्ये, रोपांच्या लागवडीसाठी मातीचा वापर करणे टाळतात. कारण मातीमध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू असतात. व्हर्टिकल फार्मिंग करताना रोगाचा किंवा कोणत्याही किडीचा प्रभाव होऊ नये याकडे लक्ष दिले जाते. हायड्रोप्रोनिक्सच्या वापराअंतर्गत मातीऐवजी कोकोपीट किंवा द्रव्यांच्या आधारे रोपाची लागवड केली जाते.

सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर :-

व्हर्टिकल फार्मिंग करताना सेंद्रिय खतांचा अधिकाधिक प्रमाणात वापर करणे फायद्याचे ठरते. कारण सेंद्रिय खतांचा वापर केल्यास रोपांवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. तसेच दर्जेदार उत्पादन घेणे शक्य होते.

प्रकाशासाठी आवश्यक व्यवस्था :-

व्हर्टिकल फार्मिंग करताना रोपांना  प्रकाश मिळेल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. जिथे शक्य आणि आवश्यक असेल तिथे सूर्यप्रकाश आणि जर सूर्यप्रकाश नसेल तर कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. अन्यथा रोपांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन रोपांची वाढ थांबू शकते.

फर्टिगेशन द्वारे विद्राव्य खताचा वापर :-

व्हर्टिकल फार्मिंग करताना ड्रीप इरिगेशन (ठिबक सिंचनाचा) वापर केला जातो. यामुळे विद्राव्य खतांचा वापर करून रोपांच्या मुळाशी प्रभावीपणे खत देणे शक्य होते.
सर्वेक्षणानुसार २०५० साली जगाची ८०% लोकसंख्या शहरीभागात विस्थापित होणार असुन लोकसंख्येत ३ अब्जांनी भर पडेल (Source : FAO & NASA) असा अंदाज आहे. आणि यासाठी लागणारा भाजीपाला उपलब्ध जागेत तयार करायचा असल्यास व्हर्टीकल फार्मिंग हे वरदानच ठरेल.

हिरव्या चाऱ्यासाठीचे वरदान – हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान

बदलते हवामान आणि पाण्याची कमतरता यामुळे जनावरांना १२ महिने दर्जेदार चारा उपलब्ध करून देणे हि समस्या ठरू लागली आहे. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो.  हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे हे शक्य आहे. पारंपारिक पद्धतीपेक्षा या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी वेळेत सकस चारा उपलब्ध होऊ शकतो. मुळात या तंत्रज्ञानाने चारा तयार केल्यास खर्च आणि वेळ दोन्ही गोष्टी नियंत्रणात राहतात.
हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे काय?
हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे मातीशिवाय मका, गहू, बाजरी, ज्वारी, बार्ली किंवा तत्सम पिकांपासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून कमी जागेत व कमी पाण्याच्या मदतीने हिरवा चारा निर्माण करणे. हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक्स यंत्र (हरितगृह) चारापिके ( मका,गहू,बाजरी, इत्यादी), प्लास्टिक ट्रे (साधारण ३ x २ फूट) पाणी देण्याची यंत्रणा(मिनी स्पिंकलर किंवा ऑगर सिस्टम व टाईमर) ची आवश्यकता असते. या पद्धतीत फक्त ७ ते ८ दिवसात (20 ते 25 से. मी. उंचीचा) चारा तयार होतो. साधारण ५० चौ. फूट जागेत एक वर्षात ३६ हजार ५०० किलो चारा तयार होतो. यासाठी वर्षाला ३६ हजार ५०० लिटर पाणी लागते. जनावरांच्या गोठ्याजवळ युनिट असल्यास खर्च अत्यल्प होऊ शकतो. या तंत्रज्ञानाअंतर्गत चारा निर्मिती करताना कमी मजूर लागतात तसेच मशागतीची आवश्यकता भासत नसल्यामुळे लागवडीवर कमी खर्च होतो. ट्रेमध्ये पाण्याचा वापर करून चारापिक घेणे शक्य असल्यामुळे कमी जागेत अशाप्रकारे चारा निर्मिती करणे शक्य होते. यामुळे शेत जमिनीवर इतर नगदी पिक घेणे शक्य होते.

हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती:

हायड्रोपोनिक्स चारायंत्र हे परदेशी बनावटीचे व महागडे असल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना परवडणारे नाही. परंतु ते भारतीय बनावटीनुसार उपलब्ध साधन – सामग्रीचा (बांबू, तट्ट्या, प्लास्टिक ट्रे, ५० टक्के शेडनेट व प्लास्टिक ट्रे यांचा वापर करून साधारण ७२ चौ. फूट जागेत बसतील अशा २५ x १० x १० फूट अवघ्या १५ हजार रुपये खर्चात हे सांगाडा यंत्र तयार करता येते. याद्वारे दररोज १०० ते १२५ किलो पौष्टिक हिरवा चारा निर्मिती करता येते. यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून जास्तीत जास्त हिरवा चारा उत्पादन घेतले जाते.

असा तयार करा हिरवा चारा :

१. चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली इत्यादी  वापर होतो. या धन्याला सोडीअम हायपोक्लोराईड किंवा ई.एम. च्या द्रावणात बीजप्रक्रिया करून घेतले जाते. नंतर हे धन्य १२ तास भिजत ठेवून, २४ तास तरटाच्या पोत्यात किंवा गोन्पातात अंध्र्या खोलीत ठेवले जाते.
२. त्यानंतर प्लास्टिक ट्रेमध्ये ( ३ x २ फूट x ३ इंच उंची) पसरून ठेवले जाते. प्रती दुभत्या १० ट्रे या प्रमाणे जानावरांच्या संख्येवरून ट्रे ची संख्या ठरवावी.
३. प्लास्टिक ट्रे हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती यंत्रात पुढील ७ ते ८ दिवस ठेवावेत. १ इंची विद्युत मोटारीला लॅटरलचे कनेक्शन देऊन फोंगर सिस्टीम द्वारे प्रत्येक न्दोन तासाला ५ मिनिटे या प्रमाणे दिवसातून ६ ते ७ वेळा पाणी दिले जाते. एकूण २०० लिटर पाणी दिवसभर वापरले जाते.
४. हि यंत्रणा स्वयंचलित आहे, पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न करता पाणी देता येते. फक्त पाण्यावरच या चाऱ्याची ७ ते ८ दिवसात २० ते २५ सें. मी. पर्यंत वाढ होते.
या पद्धतीचा अवलंब केल्यास जनावरांना चारा कसा उपलब्ध करून द्यावा हि चिंता कमी होईल. आणि दुभत्या जनावरांना १२ महिने चारा उपलब्ध होईल. गरज आहे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची.

बायोगॅस संयंत्र कसे उभारावे ?

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असताना यावर आता शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना बायोगॅस हाच एक सशक्त पर्याय उपलब्ध आहे. सध्या पुरवठा होत असलेला घरगुती गॅस सिलिंडर हा मोठ्या प्रमाणावर अनुदान देऊन स्वस्त केलेला आहे, अर्थात हे अनुदान म्हणजे आपल्याच खिशातील पैसे फक्त वेगळ्या मार्गाने काढून घेतलेले असतात.
बायोगॅस बांधून ते जर शौचालयाला जोडले, तर अधिक प्रमाणात घरगुती इंधन सहज उपलब्ध होतेच पण जी स्लरी बाहेर पडते ती बागायतीसाठी उत्तम खत म्हणून वापरली जाऊ शकते. बायोगॅसच्या वापराने अन्न शिजवणे, दिवे लावणे, द्विइंधनीय जनरेटर, रेफ्रिजरेटर, वेल्डिंग इत्यादींसाठी होऊ शकते.
जागेची निवड :
  • बायोगॅस करण्यासाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी.
  • जागा शक्‍यतो घराजवळ अगर गोठ्याजवळ असावी.
  • जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी.
  • निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसावा.

बायोगॅसच्या बांधणीचे नियोजन :

  • आपल्याकडे असलेली जनावरे व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन क्षमतानिहाय बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवावे व बांधकाम करावे.
  • केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बायोगॅस मॉडेलचेच बांधकाम करावे.
  • स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन त्याच्या बांधकामाचे नियोजन करावे.
  • बांधकामावरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे दोन बायोगॅसचे प्रकार पडतात.
  • ज्या भागात मुरूम व तांबूस मातीचा प्रकार आहे, त्या ठिकाणी स्थिर घुमट संयंत्र प्रकारचे बांधकाम करावे.
  • ज्या ठिकाणी काळी माती अगर पाण्यामुळे जमीन फुगणारी आहे अशा ठिकाणी फेरोसिमेंट, प्री-फॅब्रिकेटेड फेरोसिमेंट या प्रकारचे बायोगॅस बांधावेत.

बायोगॅसचे भांडवल नियोजन:
  • ग्रामीण भागात बायोगॅस बांधकाम केल्यास केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयामार्फत अनुदान दिले जाते.
  • बांधकामासाठी लाभार्थीची आर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जातो.मिळणारी अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या कर्जखाती जमा केली जाते.
  • याशिवाय बायोगॅसचा स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापर केल्यास (उदा. – इतर ऊर्जा साधनांचा वापर कमी करून डिझेल बचत करणे, जनरेटर, रेफ्रिजरेटर यांच्या वापरासाठी बायोगॅसचा वापर केल्यास) प्रति संयंत्रास 5000 रुपये अनुदान देण्यात येते.
  • आपल्याला ज्या प्रकारचा बायोगॅस बांधायचा आहे, त्याप्रमाणे त्याचा खर्च लक्षात घ्यावा लागेल.
  • बायोगॅस योजनेतील अद्ययावत माहितीसाठी आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता
  • बांधकामाचा खर्च संयंत्राच्या आकारावर अवलंबून आहे. दोन घनमीटर क्षमतेचा संयंत्र बांधण्याचा खर्च 40-45 हजार रुपये येऊ शकतो.
  • तरंगती टाकीचे बायोगॅस (फ्लोरिंग डोम) संयंत्राला येणारा खर्चही त्याच्या आकारमानावर अवलंबून आहे. दोन घनमीटर क्षमतेचा खादी ग्रामोद्योग प्रकारच्या संयंत्रासाठी अंदाजित साधारणपणे 45-50 हजार रुपये खर्च होतो.
अ.क्र.घटकसंयंत्राचे आकारमानकेंद्र शासनाकडून प्राप्त होणारे होणारे अनुदान
(प्रति संयंत्रास)
1सर्वसाधारण लाभार्थी अनुदान1 घ.मी.रू. 4000/-
2.सर्वसाधारण लाभार्थी अनुदान2 ते 4 घ.मी.रू. 8000/-
3.बायोगॅस संयंत्र शौचालयास जोडल्यास लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान1 ते 4 घ.मी.रू. 1000/-
4.टर्न की फी (5 वर्षाच्या हमी कालावधीतील देखभाल दुरुस्तीसाठी)1 ते 4 घ.मी.रू. 1500/-
5.सेवाशुल्क1 ते 4 घ.मी.रू. 100/-
संदर्भ : http://www.mahapanchayat.gov.in

बायोगॅस संयंत्राचे भाग-

बायोगॅस संयंत्राच्या भागामध्ये प्रथम भाग डायजेस्टर (सडविणारा भाग) व दुसरा भाग गॅस होल्डर किंवा डोम (गॅससंकलक) असतो. तसेच मिश्रणाकरिता इनलेट (प्रवेशद्वार) व आऊटलेट द्वार स्लरी बाहेर पडण्यासाठी आणि गॅस पाइपलाइन हे चार पूरक भाग असतात.
डायजेस्टर (सडविणारा भाग)
  • डायजेस्टरची जोडणी जमिनीखाली करतात. डायजेस्टरची निर्मिती विटा आणि सिमेंटने बांधणी करून दंड गोलाकार आकाराची असते.
  • डायजेस्टरची खोली व आकार बायोगॅस संयंत्राच्या क्षमतेवर अवलंबून असतो.
गॅस होल्डर
  • गॅस होल्डरमध्ये डायजेस्टरमधून बाहेर पडणारा वायू (गॅस) साठविला जातो.
  • स्थिर किंवा डोम प्रकाराचा गॅस होल्डर विटा आणि सिमेंटने बांधणी करून तयार करतात, तर तरंगता ड्रम प्रकारामध्ये सिलेंडर आकाराचा गॅस होल्डर लोखंडी पत्र्यापासून तयार करतात.
  • या गॅस होल्डरच्या वरील भागामधून गॅस कॉकची पाइपलाइनशी जोडणी करून घरातील गॅस बर्नरशी जोडतात.
मिश्रण टॅंक किंवा प्रवेश द्वार
  • या टाकीत शेण व पाण्याचे 1-1 प्रमाणात मिश्रण करून ते एका इनलेट पाइपमार्फत डायजेस्टरमध्ये सोडले जाते.
आऊटलेट किंवा निकास द्वार
  • डायजेस्टरमधून टाकण्यात आलेली स्लरीचे मिश्रण आऊटलेट किंवा निकासद्वारा मधून बाहेर येते.
स्लरी साठवण्याचा खड्डा
  • आऊटलेटमधून बाहेर पडलेली स्लरी या खड्ड्यांमध्ये साठविली जाते. ही स्लरी एकतर वाळवतात किंवा थेट शेतात पसरवतात. या जैविक खतामध्ये दोन पट नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश आणि पोषक तत्त्व असतात.
गॅस पाइपलाइन
  • गॅस पाइपलाइनद्वारा चुली/ बर्नरपर्यंत पोचविला जातो.

बायोगॅस संयंत्राची कार्यपद्धती-

सेंद्रिय पदार्थाचे जिवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात.
  • यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो.
  • बायोमास गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो.
  • बायोमास गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो.
  • बायोगॅस वायूमध्ये मिथेन 55 ते 70 टक्के, कार्बन-डाय- ऑक्‍साईड 30 ते 40 टक्के अल्प प्रमाणात नायट्रोजन व हायड्रोजन सल्फाईड या वायूंचा समावेश असतो.
  • यातील मिथेन हा वायू ज्वलनशील आहे. कोणत्याही प्रकारचे टाकाऊ पदार्थ, जे कुजतात त्यांच्यापासून बायोगॅस तयार होतो. उदा. शेण, घरातील खरकटे अन्न, निरुपयोगी भाजीपाला, पशुविष्ठा, मानवी विष्ठा, इ. पदार्थांचे मिश्रण पाण्याबरोबर करून बायोगॅस संयंत्राच्या प्रवेश कक्षामध्ये पाचक यंत्रामध्ये सोडण्यात येते.
  • पाचक यंत्रामध्ये कालांतराने कार्यक्षम जिवाणू तयार होतात व ऍसिटिक ऍसिड तयार होऊन पाच विभिन्न प्रकारचे जिवाणू तयार होऊन मिथेन व कार्बन-डाय- ऑक्साईड हे वायू तयार होतात.
  • बायोगॅस संयंत्राची रचना करताना त्यामध्ये हवाबंद, बंदिस्त पोकळी तयार करावी लागते. त्या पोकळीत सेंद्रिय पदार्थ टाकण्याची सोय करावी लागते, तसेच सेंद्रिय पदार्थांपासून तयार होणारा गॅस व खत बाहेर येण्याची व साठविण्याची सोय करावी लागते.

बायोगॅससाठी आवश्यक बाबी :

  • कच्च्या मालाची उपलब्धता-कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरच बायोगॅस संयंत्राचा आकार ठरवता येतो.
  • साधारणपणे दर रोज 10 किलो शेण मिळेल असे मानले तर ताज्या शेणापासून सुमारे 40 लिटर/किलो वायू मिळू शकतो.
  • म्हणजेच 3 घनमीटर बायोगॅस तयार करण्यासाठी सुमारे 75 किलो शेण लागेल (3/0.04). म्‍हणून, गरजेपुरते शेण मिळवण्यासाठी किमान 4 गुरांची गरज असते.

बायोगॅस स्लरीचे खत :

  • बायोगॅसपासून मिळणारे खत हे द्रवरूप आणि घनरूपात (वाळवून) अशा दोन प्रकारे वापरता येते.
  • स्लरीरूपात खत शेतात वापरल्यास खत शेतामध्ये मुरून पिकास उपयुक्त ठरते.
    गॅसप्लॅंटजवळ खत साठविण्यासाठी खड्डा तयार करावा.
  • खत साठविण्यासाठी आऊटलेटला लागून (रेचक कुंडी) दोन खड्डे करावे लागतील.
  • एक खड्डा भरल्यानंतर दुसऱ्या खड्ड्यात स्लरी सोडावी. खत वाळल्यानंतर ते हंगामानुसार शेतात वापरावे.
संदर्भ :
  • १. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
  • २. ॲग्रोवन
  • ३. महापंचायत.

गुळ निर्मिती

गुळ आणि भारतीय खाद्यपदार्थ यांचे एक वेगळे नाते आहे. विविध पदार्थांमध्ये गोडवा आणण्याचे काम करणाऱ्या गुळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. वैज्ञानिक मान्यतेनुसार गोड खाल्याने शरीरातील रक्तसंचार वाढतो. उर्जा मिळते. सर्दी, कफ या आजारांमध्ये गुळ लाभदायक आहे. गुळ तयार करण्याची एक पद्धत आहे एक तंत्रज्ञान आहे. सुधारित तंत्रज्ञानाने गुळ निर्मिती कशी करावी हे जाणून घेऊया.
ऊसाचे पिक परिपक्व होण्यासाठी साधारण एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो. गुळ निर्मितीसाठी ऊसाची तोडणी करण्याआधी ऊस पूर्ण परिपक्व होणे गरजेचे आहे. कारण अपरिपक्व उसापासून गुळाचा उतारा कमी मिळतो, गूळ नरम बनतो. गूळ रवाळ होत नाही. साठवणी दरम्यान असा गूळ खराब होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच योग्य प्रमाणात पक्व झाल्यानंतरच ऊसाची तोडणी करावी.

ऊसतोडणी –

पक्वतेची चाचणी घेतल्यानंतर धारदार कोयत्याने पक्व उसाची तोडणी जमिनीलगत करावी, त्यामुळे बुडक्या कडील जास्त साखर असलेल्या कांड्या वाया जात नाहीत. ऊसावरील मुळ्या, पाचट, माती काढून ऊस स्वच्छ करावा. ऊसाच्या शेंड्याकडील दोन ते तीन कोवळ्या अपक्व कांड्या वाढ्याबरोबर तोडून टाकाव्यात कारण त्यामध्ये पाण्याचे, नत्राचे आणि ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते तर साखरेचे प्रमाण अत्यल्प असते, त्यामुळे गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.

हॅंड रेफ्रॅक्टो मीटरचा वापर –

  • या उपकरणासोबत रस काढण्यासाठी टोचा मिळतो. ऊसाच्या ८ ते १० व्या पेऱ्यावर थोडासा तिरकस कोनाने टोचा आत टोचावा आणि थोडासा फिरवावा.
  • टोच्याच्या पोकळीतून रस घेऊन काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बाटलीत जमा करावा. कमीत कमी ८ ते १० ठिकाणांहून रस घेऊन एकत्र करावा.
  • या रसाचे दोन थेंब हॅंड रेफ्रॅक्टो्मीटरच्या तबकडीवरील काचेवर घेऊन लोलकाने झाकावे.
  • उजेडाकडे तोंड करून दुर्बिणीतून पाहिल्यास ब्रिक्सची उभी मोजपट्टी आणि रसाचा फिक्कट थर दिसतो. दोन्ही रेषा जेथे जुळतात ते ब्रिक्सचे रीडिंग समजावे.

स्पींडल ब्रीक्स हायड्रोमीटरचा वापर –

  • ऊसाचा प्रातिनिधिक नमुना घेऊन त्याचा रस चरक्याच्या साहाय्याने काढावा.
  • रस एक लिटर क्षमतेच्या मोजपात्रात अथवा त्यासारख्या उभट भांड्यात घ्यावा.
  • रसाचा फेस तसेच बुडबुडे काढून रसात अलगदपणे ब्रिक्स हायड्रोमीटर सोडावा.
  • हायड्रोमीटर स्थिर झाल्यानंतर रसाच्या पातळीशी जुळणारी ब्रिक्सची रेषा मोजावी.

गुळ निर्मिती तंत्रज्ञान –

  • ऊस गाळपासाठी आडव्या तीन लाट्यांचा, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने गिअर बॉक्स असलेल्या चारक्याची निवड करावी.
  • गुऱ्हाळासाठी चरक्या ची गाळप क्षमता साधारणपणे ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत असणे गरजेचे आहे.
  • गाळप वाढल्यास सूक्ष्म कचऱ्याचे प्रमाण वाढते, रसातील सुक्रोजचे प्रमाण वाढते; परंतु खनिजे आणि ग्लुकोजचे प्रमाण कमी होते, त्यामुळे गुळाचे औषधी महत्त्व कमी होते.
  • ऊसाच्या रसात फिनॉलिक द्रव्य असतात. या द्रव्यांचा लोखंडाशी संबंध आल्यास त्याचा गुळाच्या रंगावर विपरित परिणाम होतो म्हणून रसाचा लोखंडाशी संपर्क टाळावा.
  • स्वच्छ आणि आरोग्य पूर्ण वातावरणात तसेच निर्यातक्षम गूळ तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील चरक्याचा वापर करावा.
  • द्विस्तरीय पद्धतीच्या गाळणीतून रस चांगला गाळून घेऊन “फूड ग्रेड’चे प्लॅस्टिक अथवा स्टीलच्या नळीतून मंदानात घ्यावा.
  • मंदानातील स्वच्छ रस पंपाच्या साहाय्याने प्लॅस्टिकच्या अथवा स्टीलच्या साठवण हौदात स्थिरीकरणासाठी ठेवावा.
  • तयार झालेला रस स्थिरीकरणासाठी ठेवताना गुळ कशा आकारमानात हवा आहे, त्याप्रमाणे भांड्याची निवड करावी. एकदा गुळ स्थिर झाला कि मग त्याच्या आकारमानानुसार विभागणी करावी. विक्रीसाठी नेताना आवश्यक ती काळजी घेऊन गरजेनुसार पॅकेजिंग करावे. जेणेकरून वाहतुकीदरम्यान उत्पादन उत्तम राहील.