अन्नधान्यामध्ये प्रामुख्याने बाह्यपदार्थ, जसे की खडे, माती, लोखंडाचा चुरा, निकृष्ट धान्याची भेसळ केली जाते. कधी कधी तर धान्यामध्ये किडे आणि लेंड्याही आढळतात, ज्यापासून अनेक विकार होण्याची शक्यताही असते. यातील काही भेसळ डोळ्यांनी पाहूनही समजते, तर काहींसाठी चाचणी पद्धतीचा अवलंब करावा लागतो.
- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
चांगल्या प्रतीच्या अन्नधान्य आणि इतर मालाची गुणवत्ता कमी करणे म्हणजेच भेसळ. विक्री करावयाचा कोणताही उत्तम प्रतीचा माल (त्यात इतर पदार्थ मिसळून किंवा त्यातील कार्यकारी घटक काढून) तो कनिष्ट प्रतीचा करून तो चांगल्या प्रतीचाच असल्याचे दर्शविणे, यास भेसळ करणे असे म्हणतात. अशी भेसळ करण्यामागे जास्तीचा अधिक नफा मिळविणे हाच प्रमुख हेतू असतो.
बाह्यपदार्थांची भेसळ
अन्नधान्यामध्ये बाह्यपदार्थांच्या भेसळीचे प्रमाण सर्वात जास्त आढळते. यात माती, पेंढ, छोटे दगड, खडे, तण बियाणे, कीटक, लेंढ्या, खराब ध्यान्य इत्यादी बाह्य धान्याची भेसळ होते. ही भेसळ ओळखण्यासाठी थोडे धान्य एका काचेच्या प्लेटमध्ये घेऊन त्यात अशुद्ध असणाऱ्या धान्याचे सर्वेक्षण करावे. शुद्ध धान्यामध्ये कसलीच विशुद्धी दिसत नाही. परंतु भेसळ केलेली असल्यास ती उघड्या डोळ्याने ही दिसते.
धोतऱ्याच्या बियांची भेसळ
थोडे धान्य एका काचेच्या प्लेटमध्ये घ्यावे. धोतऱ्याचे बी हे सपाट कडेदार असून ते तपकिरी काळसर रंगाचे असते. सूक्ष्म सर्वेक्षण चाचणीने म्हणजेच उघड्या डोळ्यांनी व्यवस्थित निरीक्षणाने आपण ही भेसळ ओळखू शकतो.
रव्यामध्ये लोखंडाचा चुरा
रव्यामध्ये वजन वाढवण्यासाठी लोखंडाचा चुरा मिसळला जातो. रवा एका परातीत पसरून त्यावर लोहचुंबक फिरवून लोखंड वेगळे काढता येते.
गव्हाच्या पिठात जादा कोंड्याची भेसळ
ही भेसळ तपासण्यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यावे. थोडेसे गव्हाचे पीठ पाण्यावर विखुरावे. शुद्ध पिठात पाण्यावर जास्तीचा कोंडा दिसणार नाही. परंतु, भेसळ असलेल्या गव्हाच्या पिठात जास्तीचा कोंडा तरंगताना दिसेल.
डाळीमध्ये रंगाची भेसळ
मेटालिक यलो हा अपायकारक रंग तूरडाळ, मूगडाळ किंवा चणाडाळीमध्ये वापरला जातो. हे तपासण्यासाठी थोड्या कोमट केलेल्या पाण्यात डाळ टाकावी. हे पाणी वेगळे काढून त्यात हायड्रोक्लोरिक आम्लाचे थोडे थेंब टाकावेत. मिश्रणाला गुलाबी रंग प्राप्त झाल्यास भेसळ आहे असे समजावे.असे समजावे.
डाळीमध्ये केसरी डाळीची भेसळ
यात थोडी संपूर्ण डाळ किंवा फोड डाळ एका प्लेटमध्ये घेऊन त्याचे निरीक्षण करावे. केसरी डाळीला थोडी धार असून ती एका बाजूने तिरकस तर दुसऱ्या बाजूने चौकोनी आकाराची असते. अशाप्रकारे सूक्ष्म निरीक्षणाने आपण ती डाळ भेसळयुक्त आहे किंवा नाही हे ठरवू शकतो.
तांदळामध्ये हळदीची भेसळ
चमचाभर तांदूळ प्लेटमध्ये घेऊन त्यावर खाण्याचा चुना शिंपडावा. शुद्ध तांदळाला लालसर रंग येणार नाही, परंतु लाल रंग आला म्हणजे भेसळ आहे असे स्पष्ट होते. आणखी एका चाचणीसाठी थोड्या भाताचा नमुना टेस्टट्यूबमध्ये घेऊन त्यावर थोडे पाणी घालून मिश्रण हलवावे. बोरिक आम्लामध्ये बुडवलेला फिल्टर पेपर मिश्रणात बुडवला असता, त्याचा रंग गुलाबी झाला तर त्यामध्ये भेसळ आहे असे समजावे.
मैद्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या पिठाची भेसळ
जेव्हा पिठाचा लगदा हा उरलेल्या किंवा स्वस्त अशा निकृष्ट पिठापासून बनवला जातो तेव्हा पिठासाठी जास्त पाण्याची गरज लागते. तसेच तयार झालेल्या पदार्थाला चव लागत नाही.
नाचणीमध्ये रोडामाईन ‘ब’ची भेसळ
मुख्यतः रोडामाईन ‘ब’चा वापर हा नाचणीला वरुन रंग देण्यासाठी केला जातो. ही भेसळ ओळखण्यासाठी प्रथम पाण्यात किंवा तेलात भिजविलेला कापसाचा गोळा घ्यावा. तो गोळा नाचणीच्या बाह्य पृष्ठभागावर थोडा रगडावा. जर कापसाच्या बोळ्याने रंग शोषून घेतला तर रोडामाईन ब ची भेसळ झालेली आहे असे समजावे.
डाळीमध्ये लीड क्रोमेटची भेसळ
थोडी डाळ आणि पाणी एकत्र करून त्यात हायड्रोक्लोरिक आम्लाचे काही थेंब टाकावे. मिश्रणाला गुलाबी रंग आला असता डाळीमध्ये लीड क्रोमेटची भेसळ आहे असे समजावे.
डॉ. रामेश्वर जाजू , ९४२०४२२९८९
(अन्न व्यवसाय व्यवस्थापन विभाग, एम.जी.एम. अन्नतंत्र महाविद्यालय, औरंगाबाद)




0 comments:
Post a Comment