Thursday, March 12, 2020

उन्हाळी मिरची लागवड

हिरव्‍या मिरचीला बाजारामध्ये वर्षभर मागणी असते. उन्हाळी मिरचीची लागवड सरी वरंबा पद्धतीने मार्च महिन्यात पूर्ण करावी. लागवडीसाठी सुधारित जातींची निवड करावी.

हवामान 
उष्‍ण आणि दमट हवामानात पिकाची वाढ चांगली होते. मिरचीला ४० इंचापेक्षा कमी पाऊस व वाढीसाठी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता असते. बियांची उगवण १८ ते २७ सेल्सिअस तापमानास चांगली होते.
कोणत्याही हंगामात मिरचीची लागवड करता येते. तापमानातील तफावतीमुळे फळे व फुले जास्त प्रमाणात गळतात व उत्‍पादनात घट येते. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जमीन 
मध्‍यम ते भारी, पाण्‍याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत पीक चांगले येते. हलक्‍या जमिनीत योग्‍य प्रमाणात सेंद्रिय खते वापरल्‍यास पीक चांगले येते.
उन्‍हाळ्यात मध्‍यम ते भारी जमिनीत लागवड करावी. चुनखडीयुक्त जमिनीतही पीक चांगले येते.

हंगाम ः
उन्‍हाळी लागवड फेब्रुवारी ते मार्च महिन्‍यात करावी.

वाण 
लागवडीसाठी पुसा ज्‍वाला, पंत सी- १, संकेश्‍वरी ३२, जी-२, जी-३, जी-४, जी-५, मुसाळवाडी, पुसा सदाबहार, कॅलेंडर अग्निरेखा, परभणी टॉल, फूले ज्‍योती, कोकण क्रांती, फुले मुक्‍ता, फुले सूर्यमुखी, एनपी- ४६ या जातींची निवड करावी. 

बियाणे 
लागवडीसाठी हेक्‍टरी १ ते दीड किलो बियाणे वापरावे.

पूर्वमशागत
नांगरणी व वखरणी करून जमीन तयार करावी. शेतामध्ये हेक्‍टरी ९ ते १० टन कुजलेले शेणखत मिसळावे.

लागवड 
जिरायती पिकासाठी सपाट वाफ्यावर व बागायती पिकासाठी गादी वाफ्यावर रोपे तयार केली जातात. गादी वाफे तयार करण्‍यासाठी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. 

हेक्‍टरी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीसाठी २५ फूट लांब ४ फूट रुंद १० सेमी उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्‍येक गादी वाफ्यावर ३० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो नत्रयुक्त खत मिसळावे.

बी पेरण्‍यासाठी ८ ते १० सेंमी अंतरावर वाफ्याच्‍या रुंदीला समांतर ओळी करून पेरणी करावी.

बियांची उगवण होईपर्यंत वाफ्यांना दररोज झारीने पाणी द्यावे. पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.

उंच व पसरट वाढणाऱ्या जातींची ६० बाय ६० सेंमी आणि बुटक्‍या जातींची ६० बाय ४५ सेंमी अंतरावर लागवड करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड ४५ बाय ४५ सेंमी अंतरावर करावी. रोपांची सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी.

लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे प्रति लिटर पाण्‍यात क्लोरपायरीफॉस (३६ टक्‍के प्रवाही) १.५ मिलि अधिक १.४ ग्रॅम मॅंकोझेब अधिक ३० ग्रॅम पाण्‍यात विरघळणाऱ्या गंधकाच्या द्रावणात बुडवून लावावेत.

खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन 
कोरडवाहू मिरचीसाठी हेक्‍टरी ५० किलो नत्र ५० किलो स्फुरद आणि ओलितासाठी हेक्‍टरी १०० किलो नत्र ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. रोप लागवडीच्‍या वेळी स्फुरद आणि पालाशची पूर्ण आणि नत्राची अर्धी मात्रा द्यावी. उर्वरीत नत्राची मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी बांगडी पद्धतीने द्यावी.

जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्‍त किंवा कमी पाणी देऊ नये. फूल आणि फळ अवस्थेतील झाडांना पाण्‍याचा ताण द्यावा. उन्‍हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्‍या अंतराने पिकाला पाणी द्यावे.

आंतरमशागत 
रोप लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्‍यानंतर तणांच्‍या तीव्रतेनुसार खुरपण्‍या करून शेत तणविरहित ठेवावे. 
लागवडीनंतर २ ते ३ आठवड्यांनी रोपांना मातीची भर द्यावी. 
 : डॉ. बालाजी थोरात, ९१४५७७२२९३ 
(डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)



0 comments:

Post a Comment