परभणी जिल्ह्यातील भोगाव साबळे (ता.परभणी) येथील साबळे बंधूंनी संयुक्त कुटूंब पध्दतीच्या जोरावर एकात्मीक शेती विकसित केली आहे. हंगामी पिकांना फळबागांची जोड व देशी सुमारे ५० गीर गायींचे संगोपन या आधारे शेतीचे अर्थकारण बळकट केले आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पूरक, प्रक्रिया उद्योग, फळबागांच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीतही शेती व्यवसायात टिकवून धरला आहे. परभणीपासून सुमारे १९ किलोमीटरवरील भोगाव साबळे येथील नामदेवराव देवराव साबळे यांनीही हंगामी पिके व फळबागा व त्यास दुग्धव्यवसायाची जोड या माध्यमातून एकात्मीक शेती साधून उत्पन्नाची आर्थिक बाजू भक्कम केली आहे.
एकात्मीक शेतीची रचना
नामदेवरावांना रामेश्वर, उत्तम व विठ्ठल अशी तीन मुले आहेत. संयुक्त कुटंबात सुमारे १५ सदस्य आहेत. भोगाव शिवारात मध्यम ते भारी प्रकारची २० एकर जमीन आहे. सिंचनासाठी विहिरीची सुविधा आहे. खरिपात मूग, उडीद, तूर तर रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा आदी पीके घेत असत. काही वर्षांपूर्वी कपाशी आणि सोयाबीन या दोन नगदी पिकांवर भर होता. परंतु उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे अलिकडील काळात ही लागवड पूर्ण बंद केली. प्रत्येकी पाच एकरांवर पेरु आणि डाळिंबाची लागवड केली आहे. उर्वरित दहा एकरांमध्ये खरीप, रब्बी तसेच चारा पिकांचे उत्पादन ते घेतात. नामदेवरावांना जनावरांची आवड आहे. त्यांच्याकडे सुरुवातीला काही गायी होत्या. दरम्यानच्या काळात आमडापूर येथील साखर कारखान्याच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या गीर गायी सांभाळणाऱ्या गुर्जरांसोबत काही काळ ते राहिले. त्यातून गोसंगोपनाबाबत अधिक माहिती मिळाली. त्याचे अर्थकारण समजून घेतले.
गीर गायींचे संगोपन
सन २०१५ मध्ये गुजरातहून प्रत्येकी किमान सुमारे ५० हजार रुपये किंमतीच्या तीन गीर गायी आणल्या. साबळे यांचे शेत गावापासून एक ते दीड किलोमीटर दूर आहे. शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे ये-जा करण्यासाठी, शेतमाल वाहतुकीसाठी अडचणी येतात. त्यामुळे गायींच्या संगोपनासाठी शेतामध्ये ५१ बाय २० फूट आकाराच्या पत्राचा गोठा उभारला.
गोठ्याची काही वैशिष्ट्ये
-सिमेंट कॅांक्रिटची गच्ची. त्यामुळे स्वच्छता ठेवण्यास चांगली मदत.
-गोठ्याची विभागणी दोन भागांत. एका बाजूला दुधाळ तर दुस-या बाजूला भाकड गायी आणि वासरांची व्यवस्था
-मुक्तसंचार पध्दतीचा ८० बाय ५० फुटाचा गोठा देखील आहे. गो
-स्वच्छ पाण्याची व्यवस्था
-सध्या लहान-मोठ्या मिळून सुमारे ५० पर्यंत संख्या.
-पैदाशीसाठी जातीवंत गीर वळूचे संगोपन. त्यामुळे वंशशुध्दी राखण्यास मदत.
-चाऱ्यासाठी एक एकरांत ऊस तर रब्बी ज्वारीची ४ ते ५ एकरांत लागवड. गरज पडल्यास ज्वारीचा कडबा विकत घेतात. हरभरा, गहू, तूर, ज्वारी यांचा भुस्सा मिश्रण करुन दिला जातो. सरकी पेंडीचा खुराकही दिला जातो.
सेंद्रिय पध्दतीचा वापर
गोठयातील गोमूत्र संकलित करण्यासाठी सिमेंटचा हौद बांधला आहे. शेजारी जिवाणू कल्चर निर्मितीसाठी दोन हजार लिटर क्षमतेचा हौद बांधला आहे. ठिबक संचाव्दारे फळपिकांना जिवाणू कल्चर दिले जाते. जीवामृत, निंबोळी अर्क आदींचाही वापर होतो. त्याद्वारे जमिनीची सुरीकता वाढली आहे.
शेणखत विक्री
सुमारे ५० जनावरांपासून भरपूर शेणखत उपलब्ध होते. मुक्तसंचार गोठ्यात पडणारे शेण, गोमूत्र तसेच गायी, वासराच्या पायदळी तुडवले जाते. त्यातून गोखूर खत तयार होते. ते पिकांसाठी फायदेशीर ठरते.
स्वतःच्या शेतात वापर करुन शिल्लक खताची विक्री होते. गेल्यावर्षी प्रति किलो १२ रुपये दराने सहा टन विक्री झाली.
दूध विक्री
सध्या दररोज ६० ते ८० लिटर दूध संकलित होते. घरोघरी रतीब घालण्यात येते. सुमारे १४० ग्राहक जोडले आहेत. दुधाला प्रति लिटर ६० रुपये दर आहे. थेट विक्रीचा फायदा होतो.
रामेश्वर मुलांच्या शिक्षणानिमित्त परभणी शहरात वास्तव्यास आहेत. रामेश्वर तसेच उत्तम हे दोघे
आलटून पालटून दररोज सकाळी आणि संध्याकाळी दुचाकीद्वारे शेतातून परभणी शहरात दूध विक्रीसाठी आणतात. पावसाळ्यात चिखल असल्याने शेतातून पक्क्या रस्त्यापर्यंत दूध घेऊन येण्यासाठी घोड्याचा वापर करावा लागतो.
मसाला दूध विक्री...
परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील भाडेतत्वावरीलस जागेत खवा, तूप, पनीर आदी प्रक्रिया पदार्थ निर्मिती सुरु केली आहे. मागणीनुसार ग्राहकांसाठी उत्पादने उपलब्ध केली जातात. अलिकडेच मसाला दुधाची विक्री येथून सुरु केली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे ती बंद आहे.
फळबागांचा विकास
तीन वर्षांपूर्वी पाच एकरांत जी विलास पेरुची तर डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. नैसर्गिक पध्दतीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. गेल्यावर्षीपासून पेरुचे उत्पादन सुरु झाले आहे. गोड दर्जेदार पेरुंना ग्राहकांची पसंती असते.
शेततळ्याव्दारे विहिर पुनर्भरण...
विहिर सुमारे ११० फूट खोल आहे. विहिरीचे फेरभरण करण्यासाठी शेततळे खोदले आहे. शेताशेजारुन वाहणाऱ्या ओढयाचे पाणी शेततळ्यात जमा केले जाते. तेथून पाईपव्दारे विहिरीत सोडले जाते.
एकोप्यांतून कामांची विभागणी
कुटूंबाचा एकोपा ही साबळे यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. नामदेवराव यांचे वय ६५ वर्षे आहे. या वयातही ते मोठया उत्साहाने गायींच्या चारा-पाण्याची जबाबदारी पार पाडतात. त्या निमित्ताने हिंडणे -फिरणे होत असल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी दूर झाल्या आहेत. रामेश्वर आणि उत्तम यांच्याकडे दूध काढणे, परभणी शहरात विक्री अशी जबाबदारी आहे. विठ्ठल यांच्याकडे शेतीकामांचे नियोजन असते.
दोन सालगडी आहेत. गरजेनुसार मजूर बोलावले जातात.
रामेश्वर साबळे- ९५११२६७६३९, ९९२२६९९४३४०
0 comments:
Post a Comment