Monday, March 2, 2020

लेअर कुक्कुटपालनातून मिळवली आर्थिक सक्षमता  

माळीसागज (जि. औरंगाबाद) येथील भाऊसाहेब रोठे यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीला लेअर कुक्कुटपालनाची जोड दिली. व्यावसायिक पद्धतीने एक हजार लेअर कोंबड्यांचे संगोपन करून अंडी विक्रीतून महिन्याला २५ ते ३० हजारांचे उत्पन्न मिळवून उत्पन्नाचा खात्रीशीर मार्ग शोधला आहे.    

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरपासून ३४ किमी अंतरावर माळीसागज (ता. वैजापूर) हे तसे आडवळणी गाव. येथील भाऊसाहेब शेषराव रोठे यांची दोन भावांमध्ये मिळून वडिलोपार्जीत साडेआठ एकर शेती आहे. भाऊसाहेब यांचे बी.ए. प्रथम वर्षापर्यंत शिक्षण झाले आहे. शेतीमध्ये कपाशी, मका या हंगामी पिकासोबत पाणी असेल तर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. केवळ शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटूंबाचा खर्च भागत नसल्याने भाऊसाहेबांनी नातेवाइकाच्या सल्ल्याने कुक्कुटपालन व्यवसायात उतरण्याचे ठरविले. या गावातील बरेच शेतकरी ब्रॉयलर कुक्कुटपालन करतात. परंतु भाऊसाहेब यांनी २०१६ पासून व्यावसायिक स्तरावर एक हजार लेअर कोंबड्याचे संगोपन सुरू केले.   

हेही वाचा : शेतीला गोपालनाची जोड देत कुटुंबांचे अर्थकारण उंचावले

लेअर कुक्कुटपालनाला सुरुवात
भाऊसाहेबांचे नातेवाईक अनेक वर्षांपासून या व्यवसायात आहेत. त्याच्याकडून धडे घेत आणि अनुभवातून शिकत शेतातच ७० फूट लांब, २५ फूट रुंद व १२.५ फूट उंचीचे शेड बांधले. या शेडसाठी त्यांना दोन लाख रुपये खर्च आला. कोंबड्यांवर ताण येऊ नये, भरपूर हवा व सूर्यप्रकाश मिळावा म्हणून शेतातच शेड उभारण्याचा निर्णय घेतला. 

पाण्यासाठी निप्पल सिस्टिम 
हवे तेवढे पाणी कोंबड्यांना घेता यावे म्हणून पिंजऱ्यामध्येच पाइपलाइनद्वारे पाणी व्यवस्था केली आहे. या पाइपलाइनवर निप्पल बसवले आहेत. या निप्पलला कोंबडीने चोचीनी दाबले की पाहिजे तेवढे पाणी पिता येते व चोच बाजूला केली की पाणी खाली पडत नाही. पाणीपुरवठ्यासाठी शेडमध्येच उंचावर २ हजार लिटर पाण्याची टाकी बसवली आहे. कोंबड्यांना निर्जंतूक पाणी दिले जाते. पाण्यामध्ये कॅल्शिअम देखील मिसळले जाते.

लेअर कोंबड्यांची खरेदी 
अंड्याचे चांगले उत्पादन देणाऱ्या ११०० संकरीत कोंबड्यांची त्यांनी संगमनेर तालुक्यातील हॅचरीमधून खरेदी केली. १०५ दिवसाची म्हणजे १५ आठवड्यांची, साधारणत: एक किलो वजनाची एक कोंबडी त्यांनी २०५ रुपयांना खरेदी केली. या कोंबड्या तुलनेने कमी वजनाच्या, खुडूक न बसणाऱ्या, कमी खाद्यात अंड्याचे जास्त उत्पादन देणाऱ्या असतात. १८ ते १९ आठवडे वयाच्या कोंबड्या अंडी देण्यास सुरुवात करतात व पुढे ७२ आठवड्यांपर्यंत साधारणत: दिवसाला एक प्रमाणे अंडी देतात. अंडी द्यायला सुरू झालेल्या कोंबडीचे वजन साधारणत: १३०० ते १३५० ग्रॅम असते.

कोंबड्यांसाठी संतुलित  खाद्याची व्यवस्था 
कोंबड्यांना लेअर मॅश खाद्य दिले जाते. खनिज आणि जीवनसत्वयुक्त संतुलित खाद्य खरेदी केले जाते. ५० किलो खाद्यामध्ये ४५ किलो भरडलेला मका अधिक ५ किलो कॅल्शिअमयुक्त खाद्य मिसळून मिश्रण तयार केले जाते. प्रति कोंबडी प्रति दिन ११० ग्रॅम प्रमाणे हे मिश्रण कोंबड्यांना दिले जाते. सकाळी सात वाजता व दुपारी साडेचार वाजता असे दोनदा हे खाद्य दिले जाते. खाद्य देण्याचे, अंडी गोळा करण्याचे काम एक ते दीड तासात पूर्ण होते. या कोंबड्यांना साधारणत: १६ तास प्रकाश लागतो. संध्याकाळी ९ वाजता शेडमधील लाईट बंद केली जाते.

लसीकरण 
१०५ दिवसांचे पक्षी आणल्याने बहुतांश लसीकरणाचे काम हॅचरीवरच झालेले असते. परंतु पक्षी पोल्ट्रीमध्ये आणल्यानंतर राणीखेत, हगवण हे रोग होऊ नये म्हणून लसीकरण केले जाते. तसेच कोंबड्यांना लिव्हर टॉनीक, कॅल्शिअम पण दिले जाते.

अंड्यांची विक्री : अंड्याचे भाव दररोज बदलतात. दररोज मुंबई मार्केटमधील भावाप्रमाणे अंड्यांची विक्री केली जाते. पहिल्या वर्षी त्यांनी ऑर्डरप्रमाणे किराणा दुकानदारांना अंडी विकली. परंतु, मनुष्यबळ नसल्याने ते आता वैजापूर येथील व्यापाऱ्यांना अंड्यांची ठोक विक्री करतात. व्यापारी पोल्ट्रीवर येऊन अंडी घेऊन जातात. सरासरी शेकडा अंड्यांसाठी ३५० ते ४०० रुपये भाव मिळतो. त्यातून ३५ रु. वाहतूक खर्च आणि कमिशन म्हणून वजा केले जातात. खर्च वजा जाता महिन्याला २५ ते ३० हजारांचे उत्पन्न त्यांना मिळते. कोंबड्या ७२ आठवड्यांच्या झाल्यानंतर त्या मांसासाठी व्यापाऱ्यांना नगाप्रमाणे विकल्या जातात. हिवाळ्यात १०० ते ११० रुपयांना, तर उन्हाळ्यात ७० रुपयांप्रमाणे कोंबड्यांची विक्री केली जाते. कोंबड्यांची विष्टा शेतामध्ये खत म्हणून वापरली जाते.

पिंजरा पद्धतीने संगोपन 
गादी पद्धतीने कोंबडीपालन न करता आधुनिक पिंजरा पद्धतीने लेअर कोंबड्यांचे संगोपन केले जाते.  या पद्धतीत कोंबड्यांची हालचाल कमी होत असल्याने खाद्य कमी लागते, मजुरी कमी लागते व विष्टेचा व कोंबड्यांचा संपर्क येत नसल्याने रोगराई येत नाही व औषधांवर खर्च कमी येतो. एका पिंजऱ्यात पाच कोंबड्या बसतात. तीन थरांमध्ये त्यांनी पिंजरे ठेवले आहेत. शेडमध्ये पिंजऱ्याची दोन भागांत मांडणी केली आहे. दोन पिंजऱ्यांमध्ये अडीच फूट अंतर ठेवून ६० फूट लांबीमध्ये पिंजरे बसवले आहेत. या पिंजऱ्यांची खरेदी व फिटिंगसाठी त्यांना २ लाख ६० हजार रुपये खर्च आला. या पिंजऱ्यांच्या पुढे खाद्य ठेवण्यासाठी पन्हाळ आहे. तसेच, पाणी देण्याचीपण व्यवस्था आहे. या पिंजऱ्यांची एकूण २ हजार १६० कोंबड्या ठेवण्याची क्षमता आहे. सर्व कामे मजुरांशिवाय घरीच केली जातात. यासाठी भाऊसाहेबांना पत्नीची मदत होते. 

  भाऊसाहेब रोठे, ९८८१४१११७४, ७०५७२०२०२९ (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)



0 comments:

Post a Comment