Tuesday, May 5, 2020

शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने कापूस खरेदी नोंदणीच बंद 

अकोला - कापूस विक्रीचा सर्वत्र पेच तयार झाल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत. शेतकऱ्यांसमोरील प्रश्न कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच शेतकरी आपला माल विकला जावा यासाठी धडपडत आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी मलकापूर येथे कापूस खरेदी नोंदणीसाठी गर्दी उसळली होती. यावेळी सुरक्षित अंतर पाळल्या गेले नसल्याचेही दिसून आले. मात्र, आता या बाजार समितीने ३ मे पासून नोंदणी बंद करण्यात आल्याचे जाहीर केल्याने पुन्हा अनेकांसमोर प्रश्न तयार झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यंदा सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे कापूस विक्रीचा मोठा पेच तयार झालेला आहे. शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस पडून आहे. त्यातच आगामी खरीप हंगाम तोंडावर आल्याने त्यासाठी पैशांची तजवीज करणे सुरू आहे. घरात असलेला कापूस विक्री करून शेतकरी पैसे जुळविण्यासाठी धावाधाव करीत आहेत. शासकीय कापूस खरेदीतील गोंधळही सर्वत्र वाढलेले आहेत. केवळ एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करून उर्वरित माल परत पाठविला जात आहे. याचा भुर्दंड शेतकरी झेलत आहेत. 

एवढे सारे करूनही कापूस खरेदी वेगाने सुरू झालेली नाही. अनेक ठिकाणी लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून केंद्र पुन्हा उघडले नाहीत. कुठे कामगारांची अडचण आहे तर कुठे ग्रेडरचा प्रश्न बनलेला आहे. अशातच मलकापूर येथे सीसीआयचे केंद्र सुरू होत असल्याचे वृत्त आल्याने मलकापूर, मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस खरेदी नोंदणीसाठी शनिवारी (ता. दोन) मोठी गर्दी केली. रखरखत्या उन्हात शेतकरी रांगेत उभे होते. 

- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या काळात बाजार समिती प्रशासनाने नोंदणीचा वेग वाढण्यासाठी तीन टेबल ठेवले. तरीही गर्दी कमी होत नसल्याने अखेरीस कागदपत्रे घेऊन परत पाठविण्यात आले. कागदपत्रांद्वारे नोंदणी केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाजार समितीने कापूस खरेदी नोंदणी पुढील आदेशापर्यंत बंद करीत असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेमुळे दोन्ही तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. 

आमच्याकडील यंदाच्या हंगामातील संपूर्ण कापूस विकायचा शिल्लक आहे. खुल्या बाजारात कापसाला भाव नाहीत. त्यामुळे नोंदणीसाठी केंद्रावर गेलो तर नंबर लागला नाही. शासकीय खरेदी केंद्रावर केवळ एफएक्यू दर्जाचाच कापूस विकायला आणावा, असे सांगण्यात आले. त्यातच आता बाजार समितीनेही पुढील आदेशापर्यंत नोंदणी बंद ठेवल्याचे जाहीर केले आहे. आम्ही कापूस कुठे व कसा विकायचा. 
- राजेंद्र नारायण पाटील, सुभाष अर्जुन खर्चे, एकनाथ दगडू खर्चे,  कापूस उत्पादक, आडविहीर, ता. मोताळा, जि. बुलडाणा 



0 comments:

Post a Comment