अकोला- हंगाम सुरू होताच विविध फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटते. दरवर्षी शेतकऱ्यांना विविध आमिषे दाखवून फसविल्या जात असल्याचे समोर येत असते. गेल्या हंगामात एका कंपनीने बुलडाणा जिल्ह्यात हळद उत्पादकांना असे लुबाडल्याचे व नंतर वाऱ्यावर सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करीत बेणे देणाऱ्या या कंपनीने नंतर ओली हळद तर नेली नाहीच, शिवाय आता कुठलाही संपर्क ठेवलेला नाही.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याबाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या हंगामात बुलडाणा जिल्ह्यात मेहकर, लोणार, सिंदखेडराजा व इतर तालुक्यात एका कंपनीच्या एजंटानी गावागावात जात कंपनी विषयी माहिती दिली. पुण्याची मोठी कंपनी असून आपल्याला हळद व आल्याचे बेणे देऊ. तसेच आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल. कंपनीकडून काही खते व औषधी देण्यात येईल. आपली ओली हळद दोन हजार ते २३०० रुपये दराने जागेवर खरेदी केली जाईल. तसा करारनामा आम्ही तुम्हाला करून देऊ, असे सांगून कंपनीच्या प्रतिनिधींनी एकरी तीन हजार रुपये अॅडव्हान्स जमा केला. बाकी रक्कम बेणे मिळाल्यावर द्यायची व काही रक्कम ओल्या हळदीच्या पेमेंट मधून कापून घेऊ, असे सांगितले.
त्यांच्यावर विश्वास ठेवून देऊळगाव माळी या एका गावातील सुमारे पन्नास ते साठ शेतकऱ्यांनी बेणे बुक केले. यात नव्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही समावेश होता. शेवटी जूनमध्ये हळद पेरणीची वेळ आली तेव्हा अगदी वेळेवर बेणे देण्यात आले. या बेण्याचा दर्जाचा तितका चांगला नव्हता. बेण्याचा रेस्ट पिरेड संपलेला वाटत नव्हता. बेणे देताना त्यांनी प्रत्येकाकडून सोळाशे ते सतराशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे पैसे घेतले. त्यानंतर शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली. हळद लागवडीनंतर शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींसोबत वेळोवेळी संपर्क केला. परंतु त्यांनी कोणतीही औषधी आणि खते सुद्धा पुरवली नाहीत. तसेच मार्गदर्शनही केले नाही.
- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नंबर टाकले ब्लॅक लिस्टमध्ये
हळद उत्पादक शेतकरी या प्रकारामुळे चिंतातूर झाले. कंपनी प्रतिनिधींनी काही दिवसांनी फोन घेणे बंद केले. शेवटी वारंवार फोन करणाऱ्या शेतकऱ्यांचे नंबरच ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले. शेतकऱ्याने दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आमच्या कंपनी मालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने हळदीची काळजी घ्या आणि विकून टाका, असा सल्ला देण्यात आला. सदर हळदीला करपा व कंदकूज सारख्या रोगांची मोठ्या प्रमाणात लागण झालेली दिसून आली. आज रोजी कंपनीचा कोणताही व्यक्ती ओली हळद खरेदी करण्यात आलेला नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
आम्हा शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीने २१०० रुपये क्विंटल दराने बेणे देण्याचे व उत्पादीत झालेली ओली हळद नेण्याचे ठरविले. त्यांनी सुरुवातीला आमच्याकडून १६०० रुपये घेतले. राहिलेली रक्कम माल उत्पादीत झाल्यावर कपात करणार असल्याचे सांगितले. लागवडीसाठी कंपनीमार्फत काहींना बेणे दिले तर काहींना तेही दिले नाही. तेव्हापासून कंपनीचे प्रतिनिधी या भागात येणे बंद झाले. बेण्याचा दर्जा चांगला नसल्याने अनेकांच्या हळदीला कंदमाशी, कूज लागली. त्यामुळे उत्पादन कमी झाले. आता कंपनीचा किंवा त्या प्रतिनिधींचा कुठलाही संपर्क राहलेला नाही. किमान या हंगामात तरी शेतकऱ्यांनी अशा फसव्या कंपन्यांपासून सावध राहायला हवे, एवढीच अपेक्षा.
- डाॅ. गजानन गिऱ्हे, हळद उत्पादक शेतकरी, देऊळगाव माळी, ता. मेहकर जि. बुलडाणा
0 comments:
Post a Comment