पुणे - उन्हाचा चटका वाढल्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश चांगलाच तापला आहे. उन्हाच्या काहिलीने अंगाची लाही होत आहे. विदर्भात उन्हाचा ताप अधिक असल्याने सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात मुख्यत: उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
एप्रिल महिन्याचा अखेरच्या टप्प्यात राज्यात उन्हाचा चटका अधिक वाढू लागला. राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसानेही हजेरी लावल्याने सकाळी ऊन, दुपारनंतर पाऊस अशी स्थिती होती. मात्र मे महिना सुरू होताच राज्यात सुर्य आग ओकायला लागला आहे. अकोला येथे हंगामातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, वर्धा येथे ४४ अंश, जळगाव, नांदेड, परभणी, अमरावती, चंद्रपूर येथे तापमान ४३ अंशापेक्षा अधिक आहे.
मध्य प्रदेशपासून विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा, तमिळनाडूपर्यंत असलेल्या खंडीत वाऱ्यांमुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. राज्यात मुख्यत: उष्ण व कोरडे हवामान राहणार असले तरी, कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर कमी दाब क्षेत्र सक्रीय असून, ही प्रणाली कायम राहणार असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.३, जळगाव ४३.३, धुळे ४२.४, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३३.५, मालेगाव ४२.०, नाशिक ३७.९, निफाड ३९.०, सांगली ४०.०, सोलापूर ४२.९, डहाणू ३३.८, सांताक्रूझ ३४.०, रत्नागिरी ३५.२, औरंगाबाद ४०.९, परभणी ४३.७, नांदेड ४३.५, अकोला ४४.९, अमरावती ४३.८, बुलडाणा ४१.४, ब्रह्मपुरी ४४.१, चंद्रपूर ४३.८, गोंदिया ४२.९, नागपूर ४४.२, वर्धा ४४.२.
0 comments:
Post a Comment